Breaking News

काँग्रेस -राष्ट्रवादीची सत्तेतील मुजोरी लोक विसरले नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका

अ.नगर-पाथर्डीः प्रतिनिधी
भाजपाच्या महाजनादेश यात्रेसोबत राज्यात अनेक यात्रा निघाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन यात्रा आहेत तर काँग्रेसची एक यात्रा सुरू होत आहे. त्यांनी कितीही यात्रा काढल्या तरी त्यांच्या यात्रांना जनता प्रतिसाद देत नाही. कारण पंधरा वर्षे सत्तेत असताना त्यांनी केलेली मुजोरी लोक विसरलेले नाहीत. तुम्ही पंधरा वर्षे त्रास दिलात म्हणून मतदारांनी तुमच्याकडे पाठ फिरवली, जनतेकडे जाऊन त्यांची माफी मागा अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नगर जिल्ह्यात पाथर्डी येथे केली.
महाजनादेश यात्रा सोमवारी पाथर्डी येथून पुढे सुरू झाली. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, खा. सुजय विखे, यात्राप्रमुख भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, शेवगाव पाथर्डीच्या स्थानिक आमदार मोनिका राजळे, आ. शिवाजी कर्डिले, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. वैभव पिचड, माजी खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते उपस्थित होते.
काँग्रेस राष्ट्रवादीने एकदा मतदारांकडे जाऊन माफी मागावी, चार चांगल्या गोष्टी करू म्हणून सांगा तर निवडणुकीत दोनचार जागा जास्त देतील. तुमची सत्ता येण्याचे कारणच नाही. पुढची पंचवीस वर्षे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि युतीचीच सत्ता राहणार आहे. पण लोकशाहीत विरोधी पक्षाचेही महत्त्व असते आणि विरोधकांना विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचा सराव असला पाहिजे असे ते म्हणाले.
पाच वर्षे सत्तेबाहेर राहिल्यावर विरोधकांना आता एवढे कळले आहे की, लोकांमध्ये जावे लागते. मतदार राजा आहे आपण राजा नाही याचे त्यांना प्रत्यंतर आले याचा आनंद आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्ष निवडणुका हारल्यावर ईव्हीएमला दोष देतात. २००४ साली प्रथम ईव्हीएम वापरात आले. २००४ ते २०१४ सर्व निवडणुका ईव्हीएमच्या आधारेच झाल्या. त्यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वत्र निवडणुका जिंकल्या. त्यावेळी ईव्हीएम चांगले होते. पण २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जिंकायला लागले, भाजपाला यश मिळाले की, ईव्हीएम खराब म्हणून विरोधक म्हणतात. त्यांना समजायला हवे की, ईव्हीएम हे यंत्र आहे ते उमेदवाराला हरवत नाही तर मतदार हरवतो असे त्यांनी सांगितले.
पंधरा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात जी कामे होऊ शकली नाहीत त्यापेक्षा जास्त कामे पाच वर्षांत आपल्या सरकारने येथे करून दाखवली आणि महाराष्ट्रात परिवर्तन केले. पाच वर्षांत भाजपा युती सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली कामे पोहचावीत, जनतेचा आशिर्वाद पुन्हा मिळावा यासाठी यात्रा काढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगात मजबूत देश म्हणून पुढे आला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बलशाली राष्ट्र निर्माण होत असून समृद्ध महाराष्ट्र तयार करायला तुमचा आशिर्वाद हवा आहे म्हणून जनादेश घ्यायला आल्याचे त्यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यात पाऊस यंदा कमी आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे थोडा पाऊस पडला तरी पाणी उपलब्ध होते. पण पाऊसच पडला नाही तर काय करायचे, हा प्रश्न आहे. उत्तर महाराष्ट्र, गोदावरी खोरे आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करायचे आहे. त्यासाठी बाळासाहेब विखे पाटील यांच्या संकल्पनेनुसार पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात जाणारे पाणी 167 टीएमसी पाणी गोदावरी नदीत आणून उत्तर महाराष्ट्र, नगर जिल्हा व मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय केला आहे. त्याचा डीपीआर तयार करण्यात येत आहे. पुढच्या पिढीने दुष्काळ पाहू द्यायचा नाही, असा आमचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी लोकनेते गोपीनाथ मुंडे व माजी आमदार राजीव राजळे यांचे स्मरण करून मुख्यमंत्र्यांनी त्यांना विनम्र भावांजली अर्पण केली.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *