Breaking News

पुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकाचा प्रचार महत्त्वाचा? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सवाल

पुणे – राजगुरुनगर – खेडः प्रतिनिधी
आज राज्यातील जनता पुरात वाहून जात असताना मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेतून निवडणुकीचा प्रचार करत आहेत. पुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकाचा प्रचार महत्त्वाचा? असा थेट सवाल राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला केला. शिवस्वराज्य यात्रेतील दुसरी सभा राजगुरुनगर – खेड येथे पार पडली.
काल ३७० कलम काढले त्याचे मी समर्थन करतो. चांगल्याला चांगलंच बोललं पाहिजे. आता पाकव्याप्त काश्मीर आपल्यात यावा ही भारतीयांची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने या सरकारने पाऊले उचलली पाहिजेत. सरकार ज्याच्याकडे असते त्यांच्याकडे जरब पाहिजे. परंतु यांच्यामध्ये ती धमकच नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
स्थानिकांना ७५ टक्के जागा दिल्या पाहिजेत यासाठी सरकारमध्ये आल्यावर लगेच कायदा करणार असल्याचे सांगत ७१ हजार कोटीची कर्जमाफी आम्ही दिली. परंतु हे तीन वर्ष कर्जमाफी देत आहेत ही कसली यांची कर्जमाफी असा संतप्त सवाल करतानाच पश्चिम महाराष्ट्रावर या सरकारने जास्त अन्याय केल्याचा आरोपही त्यांनी केला.
ओबीसी, धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण देतो सांगितले. परंतु दिले नाही ही सगळी बनवाबनवी सुरु आहे. तुमचा पाठींबा आघाडीला हवा आहे. आम्ही चांगला कारभार करु आणि नाही केला तर त्याचा जाबही विचारु शकता असे आश्वासक उद्गारही त्यांनी काढले.
आमचं सरकार आणा सहा महिन्यात सर्व खात्यातील सगळ्या जागा भरुन दाखवतो असा जाहीर शब्द त्यांनी दिला. काही गेले, अजून जातीलही काळजी करु नका. तुम्ही आहात ना हीच पक्षाची ताकद आहे.
पेरताना बघतात कुणीकडे काय पेरत आहेत हेही माहीत नाही हे कळेना असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
आता यात्रा काढत आहेत ते शेतकरी किती आहेत हे तुम्हाला माहीत आहे. यांचा शेतीशी काय संबंध आहे का? असा सवाल केला.
जनतेसाठी काय करणार सांगत नाहीत – धनंजय मुंडे
जनतेसाठी काय करणार हे सांगत नाही. उलट येणार्‍या निवडणूकीत आमचा मुख्यमंत्री, मीच मुख्यमंत्री असणार आहे यासाठी या यात्रा आहेत असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.
दोन्ही यात्रा ज्या पक्षांनी काढल्या त्यांना जनतेचं दु:ख यांना दिसत नाही. तो फक्त दिसतो ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेसला. जनतेच्या प्रश्नावर राष्ट्रवादी रस्त्यावर उतरुन सरकारला सळो की पळो करून सोडले आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभच आता बोलू लागलाय की भाजप म्हणजे काशीचा घाट झाला आहे. कितीही पापी माणूस तिथे गेला तरी शुद्ध होतो अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली.
वयाच्या ८० व्या वर्षीही साहेबांना जनतेची चिंता आहे. ज्यांनी सर्व दिले ते या वयात साहेबांना सोडून गेले. इतिहासात छत्रपतींच्या घराण्यात फुट पाडण्याचे काम अनाजी पंतांनी केले याची नोंद आहे. या एकविसाव्या शतकात छत्रपतींच्या घरात कुणी फुट पाडण्याचे काम केले हे समजून घ्या अशी उपरोधिक टीका मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली.
छत्रपतींच्या घरात फुट पाडणार्‍यांचे पुढील २५ वर्ष सत्ता येता कामा नये. ज्यांनी छत्रपतींचे स्मारक उभारले नाही हा आपला अपमान नाही का? याचा बदला घेण्याची वेळ विधानसभेत येणार आहे ती संधी सोडू नका असे आवाहन त्यांनी केले.
७२ हजार नोकऱ्यांसाठी मेगाभरती करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचे काय झाले? तर अहो तुम्ही तर आपल्या पक्षातच मेगाभरती सुरू केल्याचा टोला लगावला.
पाच वर्षे कामे केली असती तर यात्रा काढावी लागली नसती -डॉ. कोल्हे
पाच वर्षे कामे केली असती तर तुम्हाला यात्रा काढावी लागली नसती असा टोला डॉ. अमोल कोल्हे यांनी लगावला. छत्रपतींचे नाव घेवून सत्तेत आलेल्या शिवसेनेच्या खासदारांनी शिवरायांचे साधं नावही संसदेत घेतले नाही हे दुर्दैव आहे. परंतु खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवरायांचे नाव घेत संसद दणाणून सोडले होते हेही डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
शिवसेनेने विमा कंपन्यांना इशारा देवून आजचा १८ वा दिवस आहे. परंतु पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. हे सरकार कोणाच्या भल्यासाठी आहे हे लक्षात ठेवा. मुख्यमंत्र्यांचे नागपुर आज क्राईम कॅपिटल झाले आहे. कुठे नेवून ठेवला आहे महाराष्ट्र माझा असा सवाल करतानाच येत्या विधानसभा निवडणुकीत या सगळ्याचा जाब या सरकारला विचारायला सज्ज व्हा असे आवाहनही त्यांनी केले.
या सभेला राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते व माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसेपाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, आमदार विदया चव्हाण, विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

वंचितचा आरोप, सत्ताधारी पक्षाकडून वंचितच्या उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न

वंचित बहुजन आघाडीचे जळगावचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *