Breaking News

तुमची औकात तरी आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची सरकारवर टीका

सातारा- दहिवडी : प्रतिनिधी

नुकत्याच मुंबईत झालेल्या भाजपच्या महामेळाव्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका करत चहावाल्यांच्या नादीला लागाल तर तुम्ही औषधालाही शिल्लक राहणार नसल्याची टीका केली. त्या टीकेचा खरपूस समाचार घेत पवार साहेबांचे बोट पकडून यांचे गुरु राजकारणात आले आणि हे भाजपचे बगलबच्चे टिका करतात…तुमची औकात तरी आहे का? पवारसाहेबांवर टिका करण्याची अशा शब्दात अजित पवारांनी भाजपवाल्यांना खडसावले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाचा सातवा दिवस असून सातारामधील दहिवडीमध्ये पहिल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार बोलत होते. यावेळी या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह अन्य नेत्यांची भाषणे झाली. तर माण-खटाव मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

आज भाजपवाल्यांकडून सत्तेचा गैरवापर होतोय. सत्तेची मस्ती यांना आलीय. कुणाच्याही चौकशी लाव, संशय नसतानाही आतमध्ये टाक अशा पध्दतीचा कारभार सुरु आहे. असे राजकारण कधी महाराष्ट्रात झाले नव्हते. ही परंपरा रुजवली जात असून ती थांबवण्याचे काम आपल्याला करायचे आहे.

हा भागच कष्टकरी लोकांचा आहे. इथले अनेक जण सैन्यात असून देशाची सेवा करत आहे. इथल्या लोकप्रतिनिधींनी या भागासाठी खूप काम केले. या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले. पवार साहेबांनीही एकेकाळी या भागाचे नेतृत्व केले आहे. या भागाचा विकास कसा होईल यासाठी पवार साहेबांनीही प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फक्त मतं मागायला इथे आली नाही. खरंतर तुमच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. इथे लोकांना वीज उपलब्ध नाही याबाबत सरकारकडे विचारणा केली तर थातूरमातूर उत्तरं दिली जातात. या भागाला महत्त्वाचे पद देण्याचे काम आम्ही केले, पण आज परिस्थिती काय आहे. या भागाला कोणी वाली नाही. शेतकरी भरडून निघत आहे मात्र सरकारला त्याची दखल घेण्यास वेळ नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

आपापसात भांडू नका,जो उत्तम काम करेल त्याच्या पाठिशी पक्ष उभा राहील. माण उमेदवारीबाबत पवारसाहेब निर्णय घेतील. परंतु वेगवेगळी पोस्टरबाजी करुन कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करु नका मी खपवून घेणार नाही असा दमही अजित पवार यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना दिला.

सातारा जिल्हा हागणदारी मुक्तीसाठी पहिल्या क्रमांकावर होता. या सरकारने स्वच्छ भारत अभियान आणले. काय अवस्था आहे आज. प्रत्येक ठिकाणी घाण,अस्वच्छता आहे. औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न पेटला. स्वतःला चमकवण्यासाठी योजना आणणे या सरकारचे काम आहे. जाहिरातीसाठी  करोडो रुपये खर्च केले जातात मात्र सरकार निराधार योजनेसाठी पैसे देत नाही. मराठा समाजात, मुस्लिम समाजात जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत अशांना आरक्षण मिळायला हवे अशी आमची भूमिका आहे. मात्र हे सरकार फक्त अभ्यास करत आहे, कमिट्या नेमत आहे, मात्र निर्णय काही घेत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

ऑनलाईनच्या रांगेत उभ्या करणाऱ्या सरकारला ऑफलाईन करुया – सुनिल तटकरे

तुम्हाला ऑनलाईनच्या रांगेत उभ्या करणाऱ्या या भाजप-सेनेच्या सरकारला ऑफलाईन केल्याशिवाय गप्प बसायचं नाही असा इशारा वजा निर्धार प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी यावेळी केला. बोंडअळीने ग्रस्त झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी ३० हजार रुपये देतो असे आश्वासन दिले. परंतु अद्याप एक रुपया दिलेला नाही. फलोत्पादन योजना देशात पहिली शरद पवारसाहेबांनी सुरु केली. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय या सरकारने घेतलेले नाही म्हणुन हे हल्लाबोल आंदोलन आहे. भाजपाचा स्थापना दिवस झाला त्यामध्ये शरद पवारसाहेबांवर टिका करण्यात आली. या राज्यातील स्वाभिमानी जनता पवारसाहेबांवरील टिका सहन करणार नाही असा इशाराही सुनिल तटकरे यांनी यावेळी दिला.

तुम्ही तोतरे बोलत होतात तेव्हा पवार साहेब मुख्यमंत्री होते – धनंजय मुंडे

तुम्ही तोतरे बोल बोलत होतात, तोतरी शुभंकरोती म्हणत होतात. त्यावेळी पवासाहेब मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत होते. ५० वर्षाची राजकीय कारकीर्द पवारसाहेबांची असताना त्यांच्यावर टिका करता तुमची लायकी तरी आहे का? अशा भाषेत भाजपवाल्यांना सुनावतानाच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. भाजपाच्या स्थापना महामेळाव्यात चार वर्षात सरकारने काय केले हे सांगण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शिव्या देण्यात आल्या आणि समारोपमध्ये पक्षावर भाजप नेत्यांनी टिकाही केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दखल घेतलात याचा अर्थ सर्वसामान्य लोकांचा आर्शिवाद घेवून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर येणार हे निश्चित असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले. सभेच्या सुरुवातीला भव्य अशी मोटारसायकल रॅली काढत वातावरण निर्मिती करण्यात आली. सभेत अजितदादा, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे यांना माण तालुक्यातील धनगर समाजाच्यावतीने घोंगडी आणि काठी देवून सन्मान करण्यात आला.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *