Breaking News

गेलेले गड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस लागली कामाला भाजपामध्ये गेलेल्या जुन्या सहकाऱ्यांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरु

पुणे : प्रतिनिधी

विविध जिल्ह्यातील आगामी महापालिका निवडणूका लक्षात घेवून कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या महापालिकांवर पुन्हा एकदा घड्याळ बांधण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार यांच्याकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूकीच्या काळात पक्षाला सोडून गेलेल्या अनेक जून्या सहकाऱ्यांना पुन्हा पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरु झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

राष्टरवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पडझड झालेली आहे. कधीकाळी अजित पवारांचे असलेले विश्वासू आता भाजपामध्ये असून त्यातील अनेकांकडे भाजपाने जबाबदारी सोपविली आहे. पिंपरी-चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र याच मतदारसंघातील त्यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे हे दोघेही राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपावासी झाले. तसेच तेथे जावूनही आपली आमदारकी कायम राखली. या दोघांमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेवर सध्या भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे या जून्या सहकाऱ्यांना पुन्हा पक्षात आणण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून खास करून अजित पवार यांच्याकडून सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्यामार्फत या दोघांशी संपर्क साधण्यात येत आहे. तर पुणे शहरात भाजपाची रणनीती ठरविणारे खासदार संजय काकडे यांच्याशीही राष्ट्रवादी काँग्रेसने संपर्क साधला असून त्यांनाही पुन्हा राष्ट्रवादीत आणण्याच्या हालचाली सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका, बार्शी तालुक्यातील राष्ट्रवादीतून शिवसेना आणि भाजपात गेलेल्या रश्मी बागल, दिलीप सोपल यांनाही पुन्हा राष्ट्रवादीत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहेत. याशिवाय पक्ष सोडून भाजपात गेलेले पण आमदार न झालेले अनेकजणांशी पक्षाशी संपर्क साधून त्यांना जानेवारी नंतर पक्षात जाहीर प्रवेश देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

राज्यात पक्षाला पुन्हा एकदा मजबूत आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आणण्यासाठी अजित पवारांनी या गोष्टीत जातीने लक्ष घातले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रवादीला चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी जानेवारी २०२१ पासून राज्यात सगळीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण क्षमतेने काम करताना दिसणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

सहा महिन्यात सर्व वाहनांसाठी फ्लेक्स फ्युयल इंजिन बंधनकारक केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

नागपूर : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून केंद्रीय रस्ते महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *