Breaking News

कोरोना संकटकाळात ८५ हजार ४२८ बेरोजगारांना मिळाला रोजगार कौशल्य विकास व रोजगार मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली. पण असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे एकूण ८५ हजार ४२८ इतक्या बेरोजगारांना रोजगार देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

फक्त सप्टेंबर महिन्यात ३२ हजार ९६९ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान एकूण १ लाख १७ हजार ८४३ बेरोजगारांना रोजगार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेब पोर्टलमार्फत करण्यात येते.

सप्टेंबरमध्ये या वेबपोर्टलवर ६३  हजार ५९३ इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली. यात मुंबई विभागात २७ हजार २५२, नाशिक विभागात ६ हजार ६४४, पुणे विभागात ११ हजार ६८१, औरंगाबाद विभागात ९ हजार १६१, अमरावती विभागात ५ हजार ९ तर नागपूर विभागात ३ हजार ८४६ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. तर याच महिन्यात कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे ३२ हजार ९६९ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक २० हजार ८०५, नाशिक विभागात २ हजार २४४, पुणे विभागात ४ हजार १८७, औरंगाबाद विभागात ३ हजार १२८, अमरावती विभागात १ हजार २९३ तर नागपूर विभागात १ हजार ३१२ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

कौशल्य विकास विभागाने लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरु केली. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात १११ ऑनलाईन रोजगार मेळावे झाले. सप्टेंबरमध्ये झालेल्या ३५ मेळाव्यांमध्ये २३६ उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडील १६ हजार ६८३ जागांसाठी त्यांनी व्हॉटस्अॅप, स्काईप, झूम अॅप आदींच्या सहाय्याने ऑनलाईन मुलाखती घेतल्या. या मेळाव्यांमध्ये ९ हजार ८५६ नोकरी इच्छूक तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत ३ हजार ९३६ तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरु आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल. नोकरी इच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Check Also

इराणने ताब्यात घेतलेल्या इस्त्रायली जहाजावर १७ भारतीय क्रु मेंबरर्स

नुकतेच इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे इराणच्या दुतावासाचे नुकसान आणि एका बड्या लष्करी अधिकाऱ्यासह अन्य चार लष्करी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *