Breaking News

सर्वसामान्यांमध्ये जाताना नवे बूट खरेदी करावे लागणे यासारखे आश्चर्य नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा टोला

मुंबई: प्रतिनिधी

सर्वसामान्य लोकांमध्ये जाताना राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना नवीन बूट खरेदी करावे लागतात यासारखे आश्चर्य नाही अशी खोचक टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली.

तोक्ते वादळाने कोकणात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते कोकणच्या दौर्‍यावर होते.

यावेळी प्रसिद्ध झालेल्या फोटोत दोन्ही विरोधी पक्षनेते एकसारखे नवीन बूट घातलेले दिसत आहेत. त्यामध्ये त्यांनी ‘नायकी’ चे की ‘पूमा’ चे बूट घातलेत हे माहीत नाही. परंतु फोटोत मात्र एकसारखेच बूट दिसत आहेत असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

कोरोना काळातील असमर्थता लपवण्यासाठी ‘बनारस मॉडेल’ चा प्रयत्न सुरू – मलिक

देशात कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी ‘बनारस मॉडेल’ चा प्रचार करण्यात येत आहे. मात्र असमर्थता लपवण्यासाठी हा प्रयत्न आता केला जातोय असा आरोप त्यांनी केला.

बनारसच्या घाटावरील प्रेतांवर अंत्यसंस्कार करायला जागा नव्हती. लोकांनी प्रेते गंगा नदीत टाकली या घटनेची देशभर आणि जगभर चर्चा झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बनारस मॉडेल बनवण्यासाठी डीएम, डॉक्टर्स, हॉस्पिटलमधील कर्मचारी व अधिकारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते.

मात्र बनारस मॉडेल काही नाही. ना टेस्टींग होत होती ना उपचार होत होते.औषधांचा काळाबाजार झाला. ऑक्सिजन काळयाबाजाराने विकला गेला. ‘बनारस मॉडेल’ हे ‘निदान मॉडेल’ सारखे फेल गेले आहे. त्यामुळे बनारस मॉडेलचा प्रचार बंद करा असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना मुख्यमंत्र्यांना घ्यायचं आणि बोलायचंच नाही ही पध्दत चुकीची – नवाब मलिक

जिल्हाधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांना घेऊन त्यांच्याशी चर्चा न करता जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाते. याचा अर्थ मी थेट तुमच्याशी बोलणार हा संदेश पंतप्रधानांना द्यायचा आहे का असा सवाल करतानाच ही पध्दत चुकीची आहे अशा शब्दात प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

फेडरल स्ट्रक्चरमध्ये पंतप्रधानांनी राज्याच्या प्रमुखाशी चर्चा केली पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांशी नाही. पंतप्रधान काही करत आहेत हा संदेश त्यांना द्यायचा आहे का? तुम्ही करा परंतु त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा असा सल्लाही त्यांनी दिला.

कोरोना परिस्थितीबाबत देशातील निवडक जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. यामध्ये गंभीर काहीच नव्हते असा टोला त्यांनी लगावला.

राज्यातील कामांची देखभाल आणि देखरेख ही राज्यसरकारची जबाबदारी असते. त्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात. त्यामुळे राज्याचे प्रमुख म्हणून पंतप्रधानांनी त्यांच्याशी थेट चर्चा केली पाहिजे होती असेही ते म्हणाले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *