Breaking News

मलिकांचे आरोप, एनसीबीचा खुलासा तर फडणवीसांकडून पाठराखण आणि गौप्यस्फोट आर्यन खान अटकप्रकरणावर राजकिय वातावरण चांगलेच तापतेय

मुंबई: प्रतिनिधी

बॉलीवूड स्टार शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान यांच्यासह तिघांना एनसीबीने अटक करून तुरुंगात ठेवल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांच्याकडून एनसीबीच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप करत आहेत. मात्र आज दुसऱ्यांदा पुन्हा एकदा मोहित कंबोजच्या मेहुण्यावरून मलिक यांनी आरोप केल्यानंतर एनसीबीने तीन नव्हे तर सहा जणांना सोडून दिल्याचा खुलासा करत राजकिय हेतूने आरोप करत असल्याचा प्रत्याआरोप एनसीबीने केला. मात्र आतापर्यत या कारवाईबाबत कोणतीही भूमिका न घेणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एनसीबीची पाठराखण करत नवा गौप्यस्फोट केला. त्यामुळे राजकिय वातावरण चांगले तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईच्या अनुषंगानने बोलताना म्हणाले की, एनसीबीने जी कारवाई केली, यामध्ये काही लोकांना अटक करण्यात आली. काही लोकांना सोडून देण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या अतिशय जवळच्या माणसाला सोडून दिल्याचा गौप्यस्फोट करत मात्र तो क्लीन होता अशी पुष्टीही जोडली. मात्र हा गौप्यस्फोट करताना फडणवीस यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही.

एनसीबीने केलेल्या कारवाईत अनेक लोकांना पकडण्यात आले होते. यातील जे लोक क्लीन होते त्यांना सोडून देण्यात आले. मात्र ज्या लोकांकडे काही सापडलं होतं, त्यांना एनसीबीने पकडलं. ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे. याच्याविरोधात एखादी संस्था काम करत असेल तर आपण त्या एजन्सीच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. पण या प्रकरणात राजकारण केलं जात आहे. खरं म्हणजे ज्या लोकांना सोडलं, त्यामध्ये राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्याच्या मुलाचा एक अतिशय जवळचा माणूस हादेखील होता. तो क्लीन असल्यामुळे मी त्याचे नाव घेत नाही. तो क्लीन असल्यामुळे त्याचे नाव घेऊन त्याला बदनाम करणे अयोग्य आहे. ते कुठल्या पक्षाचे होते किंवा नव्हते हा मुद्दाच येत नाही असेही ते म्हणाले.

अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी आज एनीसबीने क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी राज्य सरकार तसेच बॉलिवूडला बदनाम केलं जात असल्याचा आरोप केला. तसेच या कारवाईत पकडण्यात आलेल्या रिषभ सचदेव, प्रतीक गाभा आणि आमीर फर्निचरवाला या तिघांना सोडून देण्यात आले. युवा मोर्चाचा अध्यक्ष मोहित कुंबोज आता मोहित भारतीय म्हणून नाव लावतात. त्यांचे भाजपच्या बड्या नेत्यांसोबत संबंध आहेत. त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळालेला आहे. मोहित कुंबोज हे त्यांचे मेहुणे रिषभ सचदेवा यांना सोडवण्यासाठी NCB कार्यालयात गेले होते. समीर वानखेडे यांना भाजप नेत्यांनी फोन केल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला.

दरम्यान, मलिक यांच्या आरोपानंतर एनसबीने पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले. तीन नव्हे तर सहा जणांना सोडून देण्यात आले. त्यांच्याविरोधात पुरावा नसल्यामुळे त्यांना सोडून दिले. तर उर्वरित आठ जणांबाबत पुरावे आढळल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. आम्ही सर्व कारवाई कायद्यानुसार केली आहे. याबाबतचे कागदपत्रे आगामी काळात न्यायालयात सादर केले जाणार असल्याचे स्पष्टीकरण एनसीबीच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आले.

एनसीबीने सुरुवातीला केलेल्या कारवाईत काही शंकास्पद जागा असल्याचे प्राथमिक दर्शनी दिसून येत होते. मात्र त्याबाबत आता जसजशी माहिती पुढे येत आहे. त्यानुसार एनसीबीकडून निर्माण झालेल्या विश्वासहर्ता सावरण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यासंपूर्ण प्रकरणाबाबत कदाचीत न्यायालयात पूर्ण प्रकाश पडेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *