Breaking News

मोदीला घालवून बळीराजाचे राज्य आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ग्वाही

नाशिक-निफाडः प्रतिनिधी
या वयात फिरतो म्हणजे मी काय म्हातारा झालो का? असा सवाल करतानाच काय काळजी करु नका मी भक्कम आहे. या मोदीला घालवल्याशिवाय आणि बळीराजाचे राज्य आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी निफाडच्या जाहीर सभेत जनतेला दिली.
या जाहीर सभेला पवार यांच्याबरोबर प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, उमेदवार धनराज महाले यांच्यासह महाआघाडीचे नेते, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
शिवाय असेल नसेल ती शक्ती बळीराजाच्या भल्यासाठी वापरण्यासाठी घडयाळाच्या चिन्हावर बटण दाबून राष्ट्रवादीला विजयी करा असे आवाहनही त्यांनी केले.
आम्ही शेतीबाबत निर्णय घेतल्यामुळे देशातील शेती उत्पादन वाढले होते. परंतु आज काय परिस्थिती आहे. नवीन कारखानदारी आली नाही. शेती संकटात म्हणजे देशाची आर्थिक स्थिती संकटात येते. शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढली तर अर्थव्यवस्थेला मदत होते. शेतकऱ्यांची खरेदी करण्याची ताकद नसेल तर उद्योग, कारखाने संकटात येतात. तेच चित्र आज पहायला मिळत आहे. कारण या सरकारला शेतकऱ्यांविषयी आस्था नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
मोठया लोकांकडे काळा पैसा आहे. शेतकऱ्यांकडे कुठचा काळा पैसा. श्रीमंतांच्या काळ्या पैशाला हात लावला नाही. शेतकऱ्यांचा व्यवसाय चलनबंदीच्या माध्यमातून संकटात आणला आणि शेतकऱ्यांना संकटात आणण्याचे पाप भाजप सरकारने केल्याची जोरदार टीकाही त्यांनी केली.
व्यापारी बांधव सुरुवातीला मोदी नावाचा गजर करत होते आणि आता मोदींना काढून टाकण्याचा विचार करत आहेत. नशीब कळंल बिचार्‍यांना की हा गडी आपला नाही… हा कुणाचाच नाही… शेतकऱ्यांचा नाही… व्यापाऱ्यांचा नाही… उद्योग धंद्यातील लोकांचा नाही. बेकारी वाढली हे केंद्र सरकारने जाहीर केले. त्यामुळे नव्या पिढीचाही नाही… मग देश कुणासाठी द्यायचा यांच्या हातात. यांच्या हातात देश द्यायचा म्हणजे मुठभर लोकांच्या हिताची जपणूक करणारे घटक आहेत त्यांच्या हातात देश देण्यासारखं असल्याचंही त्यांनी सांगितले.
आमच्यात संघर्ष होतो. परंतु आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला का सोबत घेतले. कारण ते शेतकऱ्यांसाठी संघर्ष करतात. कधी कधी आमच्यावरही टीका करतात. परंतु टीका केली तरी विचार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असतो. त्यामुळे या सगळ्यांना बरोबर घेवून दिल्ली कशी नरमत नाही हे बघतो असे सांगतानाच एकदा दिल्लीत ताकद निर्माण झाली तर सरकारचे धोरण बदलू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तसा अधिकार आपल्याला दिला आहे. त्या अधिकाराचा वापर करणारे खासदार आपल्याला दिल्लीत हवेत म्हणून धनराज महाले यांना मतदान करा असे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *