Breaking News

नरेंद्र मोदींची ‘ती मुलाखत म्हणजे प्रतिमा संवर्धनाचा अत्यंत विनोदी प्रकार काँग्रेस प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी
प्रसिद्धीपासून दूर राहून शांतपणे आपले काम करीत असल्याची शेखी मिरवणाऱ्या रा. स्वं. संघाचे स्वयंसेवक नरेंद्र मोदी यांचा प्रसिद्धीचा निदिध्यास हा आश्चर्यकारक आहे. काल दिवसभर दूरदर्शनच्या कृपेने विविध वाहिन्यांवर दाखविल्या गेलेल्या सिनेनट अक्षयकुमारने घेतलेल्या मोदी यांच्या मुलाखतीने हे सिद्ध झाले आहे. ज्यांच्या भाषणांमध्ये राजकारण सोडून एकही वाक्य नसते अशा मोदींची तथाकथित अराजकीय मुलाखत ऐन निवडणुकीच्या काळात प्रसारीत करण्याचे अन्यथा काय कारण होते ? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी उपस्थित केला आहे.
एका बाजूला निवडणूक आयोगाने त्यांच्यावरील चरित्रपटाच्या प्रसारणाला बंदी घातल्याने ही क्लृप्ती योजिली आहे. तर दुसऱ्या बाजूने मोदी यांच्या प्रतिमा संवर्धनाचा (Image makeover) हा एक अत्यंत विनोदी प्रकार होता. निवडणुकीच्या अजून तीन फेऱ्या बाकी असताना सरकारी प्रसारमाध्यमावरून अशी मुलाखत प्रसिद्ध करणे हा कदाचित तांत्रिकदृष्ट्या आचारसंहितेचा भंग नसेल पण आपल्या नसलेल्या प्रतिमा निर्मितीचा हा अश्लाघ्य प्रयत्न व त्याद्वारे लोकांवर भुरळ पाडण्याचा प्रकार नक्की होता, अशी टीकाही त्यांनी केली.
गुजरातचा मुख्यमंत्री होईपर्यंत ते स्वतःचे कपडे स्वतःच धूत होते. हा त्यांचा दावाही खोटाच आहे. मोदी मुख्यमंत्री होण्याआधी संघाचे प्रचारक होते. त्यावेळी त्यांच्याकडे चांद मोहम्मद नावाचा धोबी कामाला होता. या धोब्याचे निधन २३ ऑक्टोबर २०१७ रोजी झाले. त्यामुळे मोदींचा खोटारडेपणा यातून स्पष्ट होतो. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांबद्दलचा दावाही हास्यास्पद आहे. ओबामा माझ्याशी अरे-तुरेच्या भाषेत बोलायचे असे मोदींनी म्हटले आहे. पण इंग्रजीमध्ये अरेतुरे कसे काय बोलू शकतात आणि हिंदीत बोलण्याची सोय असली तरी ओबामांना हिंदी येत नाही. तसेच इंग्रजीतील How are you चे how are तू, कसे काय होते हेही आश्चर्यच असल्याची खोपरखळीही त्यांनी लगावली.
या मुलाखतीत नेहमीप्रमाणे मोदी यांनी अनेक बालिश, विनोदी व असत्य विधाने केली. त्या विधानांची खातरजमा करण्याचे कोणतेही साधन लोकांजवळ नसल्याचा फायदा घेऊन त्यांनी अनेक मनोरंजक किस्से ऐकवल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी केली.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *