Breaking News

स्मारकासाठी मेहनत घेणाऱ्या फडणवीसांना न बोलविण्याचा संकुचितपणा भाजपा खा. नारायण राणें यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जागेपासून ते विविध विभागाच्या परवानग्या मिळवण्यासाठी ज्यांनी मुख्यमंत्री असताना सर्वाधिक मेहनत घेतली त्या देवेंद्र फडणवीस यांना आघाडी सरकारने स्मारक भूमिपूजन कार्यक्रमाचे आमंत्रणही न देण्याचा संकुचितपणा दाखविल्याची टीका भाजपा खासदार नारायण राणे यांनी आज केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 कोरोनाला अटकाव करण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या महाआघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याऐवजी लॉकडाऊन लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उतावीळ झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

वेगाने लसीकरण करण्यासाठी तसेच रुग्णालयात मोठ्या प्रमाणात खाटा उपलब्ध करून देण्यासाठी या सरकारकडे नियोजन नसल्याने रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे.

‘शिस्त पाळा नाहीतर लॉकडाऊन लावू’, अशी धमकीच हे सरकार वारंवार देत आहे. पण या लॉकडाऊनमुळे समाजातल्या विविध घटकांचे किती मोठे नुकसान होते याची कल्पनाही मुख्यमंत्र्यांना नाही. घराबाहेर न पडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जनतेच्या वेदना कशा कळणार असा सवालही त्यांनी केला.

निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाजे  आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांनी पाठवलेल्या पत्रावरून सत्ताधारीच जनतेकडून वसुली करत असल्याचे दिसते आहे. राज्यात कोरोना आणि गुन्हेगारीसोबतच भ्रष्टाचारही प्रचंड प्रमाणात बोकाळला आहे. प्रत्येक खात्यामध्ये, प्रत्येक निवीदा प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Check Also

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *