Breaking News

नांदेडचे सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकले! सा. बां. मंत्री अशोक चव्हाण यांचे मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी

कोरोना विषाणुमुळे भारतात येणारी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाल्याने महाराष्ट्रातील नांदेडचे सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकून पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

नांदेड शहरातील रहिवासी असलेले संकेत पानपट्टे, ऋतुज माने, अनिरूद्ध कुलकर्णी, गौरव देशपांडे, अमरदीप जगताप आणि शंकर नादरे हे हॉटेल मॅनेजमेंटचे सहा विद्यार्थी चार महिन्यांपूर्वी इंटर्नशिपसाठी मॉरिशसला गेले होते. २४ मार्च रोजी ते भारतात परतणार होते. परंतु, विमानसेवाच रद्द झाल्याने ते मॉरिशसमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांचा व्हिसा २५ मार्च रोजी संपणार आहे.

कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर या विद्यार्थ्यांनी मॉरिशसमधील भारतीय दुतावासाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना तिथून कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विमाने रद्द होत असताना त्यांनी परतीच्या तिकिटासंदर्भात संबंधित विमान कंपन्यांशी सुद्धा संपर्क साधला, मात्र तिथेही ठोस उत्तर मिळाले नसल्याची त्यांची तक्रार आहे.

कुठूनच मदत मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांनी सोमवारी रात्री सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. या प्रश्नाचे गांभिर्य जाणून घेत चव्हाण यांनी मुख्यमंत्री व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून या विद्यार्थ्यांच्या अडचणीशी शासनाला अवगत केले. राज्य सरकारने देखील हा प्रश्न गांभिर्याने घेतला असून, सदर ६ विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी आज या विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवर बोलून त्यांना धीर दिला. त्यांच्या मदतीसाठी शासन प्रयत्नशील असून, विमानसेवा पूर्ववत होताच त्यांना मायदेशी आणले जाईल. तोवर त्यांनी सुरक्षित ठिकाणी स्वतःची काळजी घ्यावी आणि अडचण असल्यास केव्हाही संपर्क साधावा, या शब्दांत. चव्हाण यांनी त्यांना दिलासा दिला.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *