नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी
विद्यमान विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने हे पद आता रिक्त झाले आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत दबावामुळे पक्षाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीच्या चर्चेनुसार हे पद काँग्रेसकडे होते. मात्र आता राजीनामा दिल्याने हे पद खुले झाले आहे. या पदावरील नव्या व्यक्तीची निवड पुन्हा एकदा चर्चा होईल आणि त्यानंतर निवडला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता या पदावर कोण विराजमान होणार, याची चर्चा सुरु झाली आहे. विधानसभा अध्यक्षपद मिळवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष इच्छूक आहेत. आता या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली.
तत्पूर्वी नाना पटोले यांनी बुधवारी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. काल रात्रीच नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज नाना पटोले यांनी आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोपवले जाणार, हे जवळपास निश्चित आहे.
राज्याचा उपमुख्यमंत्रीही बदलणार का?
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षबदलाबरोबरच ठाकरे सरकारच्या खातेवाटपातही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेने विधानसभा अध्यक्षपद स्वत:कडे ठेवून काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. तसेच उपमुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
