Breaking News

बैलगाडी शर्यतींबाबत महिनाभरात मार्ग काढणार पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील बैलगाडी शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडी शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडी शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धीने संगोपन केले जाते. या करीता बैलांचा सराव आणि शर्यत पूर्ववत सुरु करण्यासाठी महिन्याभरात मार्ग काढण्यात येणार असल्याचे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
मंत्रालयातील त्रिमुर्ती जवळच्या खुल्या प्रांगणात बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु करण्याविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होत. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार शशिकांत शिंदे, निलेश लंके, किसन काथोरे, अनिल बाबर, संजय जगताप, संग्राम जगताप, संग्राम थोपटे यांच्या सह लोकप्रतिनिधी आणि राज्यातील बैलगाडी मालक आणि संघटनेचे पदाधिकारी तसेच पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
संविधान आणि घटनेचा आदर करुन शर्यतीच्या सरावासाठी कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. येत्या महिन्याभरात योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल. ज्या राज्यात बैलगाडी शर्यत सुरु आहे. त्यांचाही अभ्यास करण्यात येईल. तसेच याबाबत गरज भासल्यास नवीन कायदा करण्याचाही विचार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात खिल्लार जातीचे बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या जातीचे संवर्धन होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ही जात फक्त शर्यतीसाठीच नाही तर दुध उत्पादन आणि पैदास वाढविण्यासाठीही महत्त्वाची आहे. यामुळे देशी जनावरांचे संगोपनास प्राधान्य देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. न्यायालयात बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी वरिष्ठ कायदा सल्लागारांचीही मदत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, बैलांना सराव महत्त्वाचा आहे. शर्यती आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. यासाठी सराव सुरु करण्यासाठी दिलासादायक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यातील बैलगाडी स्पर्धा पूर्ववत सुरु राहण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्न करीत आहेत. स्पर्धा सुरु करण्यासाठी सर्व विधानसभा सदस्य सकारात्मक आहेत. मंत्रालयातील प्रांगणात प्रथमच अशी बैठक पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी घेतल्याबद्दल पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.
गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले, शेतकरी आणि बैलगाडी मालक आणि विविध संघटनांची शर्यत हा जिव्हाळ्याचा विषय आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. बैलांचा सराव सुरु करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ बैठक बोलावून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
यावेळी राज्यातून आलेल्या बैलगाडी मालक आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या मागण्या व सूचना मांडल्या. उपस्थित आमदारांनी बैलगाडी शर्यतीविषयी मनोगत मांडले.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *