Breaking News

सरकारचा निर्णय मुंबई सोडून इतरत्र बहुसदस्यीय प्रभाग : मान्यता मात्र राज्यपालांच्या हाती महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासाठी अध्यादेश काढणार

मुंबई: प्रतिनिधी

आगामी वर्षात मुंबईसह १३ शहरातील महापालिका, नगरपंचायती निवडणूका नजरेसमोर ठेवून राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेत मुंबई वगळता सर्वच महापालिका, नगर पंचायतींमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पध्दत लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

तसेच यासंदर्भात अध्यादेश काढण्यात येणार असून तो लवकरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावळी त्यांनी वरील माहिती दिली.

त्यानुसार, महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर तीन पालिका सदस्य, परंतु, दोन पेक्षा कमी नाहीत व चार पेक्षा अधिक नाहीत इतकी सदस्य संख्या निर्धारित करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. यानुसार महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ३ सदस्यीय, नगर पंचायतीं क्षेत्रांमध्ये २ सदस्यीय पध्दत लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत एक सदस्यीय प्रभाग पध्दत लागू राहणार आहे. त्यामुळे पक्षिय बलाबल राखण्यासाठी मोठी कसरत सर्वच राजकिय पक्षांना करावी लागणार आहे. तर इतर महानगरपालिका शहरांमध्ये बहुसदस्यीय अर्थात तीन सदस्यीय प्रभाग पध्दत लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक भागात पॅनल पध्दतीने राजकिय निवडणूकांना या राजकिय पक्षांना लढवाव्या लागणार आहेत. यामध्ये प्रत्येक पक्षाला निवडणूक लढविणे थोडीसे सोपे जाणार आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करुन, राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये एक सदस्यीय प्रभाग पध्दती लागू करण्यात आली होती. तथापि, कोविड-19 दरम्यान निर्माण झालेली आरोग्य विषयक परिस्थिती हाताळताना निदर्शनास आलेल्या बाबी तसेच लोकप्रतिनिंधींनी निदर्शनास आणलेली वस्तुस्थिती यामुळे नागरी समस्यांचे निराकरण, जबाबदारी पार पाडणे निर्वाहन हे प्रभागात सामुहिक प्रतिनिधित्वांमुळे (बहुसदस्यीय प्रभाग पध्दती) अधिक उचित पध्दतीने होऊ शकते या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील संबंधित कलमात सुधारणा करुन महानगरपालिकांसाठी बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रभाग पध्दतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसने २ सदस्यीय पध्दतीच्या भूमिकेवर ठाम होती. तर शिवसेनेकडून ४ सदस्यीय प्रभागाच्या भूमिकेवर ठाम होती. मात्र अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याप्रकरणी साम्यजंस दाखवित तीन सदस्यीय प्रभाग पध्दतीवर सहमती घडवून आणली.

दरम्यान, राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्ती, महिला प्रश्नी नुकतेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यपालांना पाठविलेले खरमरीत भाष्येतील उत्तर या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्य सरकार दरम्यान असलेला संघर्ष पाहता यासंबधीचा अध्यादेशवर राज्यपाल सही करणार की पुन्हा हा अध्यादेशच थंड बस्त्यात गुंडाळून ठेवणार यावर राज्यातील प्रभाग पध्दतीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे राज्यपालांनी सही केली तरच आगामी महापालिका, नगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणूका या सुधारीत प्रभाग पध्दतीने होतील. तर राज्यपालांनी सहीच केली नाही तर मात्र राज्य सरकारला कॅबिनेटमध्ये निर्णय घेवूनही सध्या सुरु असलेल्या प्रभाग पध्दतीनुसार निवडणूका घ्याव्या लागणार आहेत.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *