Breaking News

दहावी-बारावीच्या या विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क सरकारकडून माफ कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारचा निर्णय

मराठी ई-बातम्या टीम
राज्यात कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या आणि २०२२ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.
कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक अथवा कायदेशीर पालक/ दत्तक पालक गमावलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी), उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) शुल्क भरण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा येऊन पुढील वाटचाल खंडीत होण्याची शक्यता आहे. यास्तव महाराष्ट्र राज्यातील अशा बाधित विद्यार्थ्यांचे व्यापक हित विचारात घेऊन महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२१-२२ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी तसेच इयत्ता बारावी या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या अशा नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
यापूर्वी राज्य सरकारकडून कोरोना काळात पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांचे पालकत्व राज्य सरकारने उचलत या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. तसेच ज्या मुलांचे आई-वडील कोरोना काळात गेले त्या मुलांच्या बँक खात्यावर पाच लाख रूपये जमा करण्यात आले असून ती मुले सज्ञान झाल्यानंतर त्यांना ते पैसे काढता येणार आहेत. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि केंद्र सरकारच्या सूचनेनुसार कोविड काळात निधन पावलेल्यांच्या वारसांना ५० हजारांचे सानुग्रह अनुदानही राज्य सरकारकडून देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. ही रक्कम संबधित वारसांना मिळावी यासाठी राज्याच्या मदत व पुर्नवसन विभागाकडून एक संकेतस्थळही सुरु करण्यात आले असून या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहनही राज्य सरकारकडून करण्यात आले.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *