Breaking News

भाजपाच्या आरोपांच्या खळखळाटाला मविआकडून थंडपणाने बांध मुख्य सचिवांच्या अहवालाने सुरुवात

मुंबई: विशेष प्रतिनिधी

अँटालिया प्रकरणात मनसुख हिरेन यांचा मृत्यूदेह आढळून आल्यापासून राज्यातील राजकिय वातावरण सातत्याने तापत राहिले असून कधी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे तर कधी परमबीर सिंग यांचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि आता पोलिस दलाच्या बदल्यांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरून सातत्याने महाराष्ट्र कधी नव्हे ऐवढा चर्चेत आहे. मात्र भाजपाच्या या सततच्या आरोपामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीकडून शांतपणे भाजपाच्या खळखळाटावर बांद घालण्याचे काम सुरु असल्याचे दिसून येत आहे. या बांधाची सुरुवात राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अहवालाने झाल्याची चर्चा आघाडीतील मंत्र्यांकडून सुरु आहे.

राज्याच्या विधानसभेत सर्वाधिक आमदार अर्थात १०५ संख्याबळ असतानाही विरोधी पक्षाची भूमिका भाजपाला पार पाडावी लागत आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षे आपलीच म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आयाराम झालेल्यांना आता हाती सत्ता नसताना टिकवून ठेवणे भाजपाला चांगलेच जड जात आहे. त्यामुळे भाजपामधील गयारामाच्या तयारीत असलेल्या आमदारांना रोखण्यासाठी भाजपाकडून प्रत्येकवेळी सत्तांतराचे गाजर दाखविण्यात येत आहे. सुरुवातीला ७२-७८ तासाच्या देवेंद्र फडणवीस-अजित पवारांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर भाजपाकडून अनेक वेळा सत्तांतराचे मुहूर्त काढण्यात आले. परंतु प्रत्येकवेळी भाजपाच्या सत्तांतराचा मुहूर्त निघून गेला तरी त्यानुसार काहीही झाले नाही. आता पुन्हा भाजपाकडून पश्चिम बंगाल आणि आसाममधील विधानसभा निवडणूकीच्या निकालाबरोबर महाराष्ट्रातही सत्तातरांची ताऱीख जाहिर केली. मात्र राज्याच्या राजकारणात भाजपाने सत्तांतराचा मुहूर्त काढला कि कोणता न कोणता राजकिय गोंधळ सुरु होतो. त्यात आता अंटालिया बंगल्याजवळ स्फोटकाने भरलेली गाडी आढळून आल्याचे प्रकरण सुरु झाल्यानंतर आता त्यात अनेक विषयांची भर पडत आता मुंबई पोलिस आयुक्तालयातील डिव्हीआर वर येवून थांबले असल्याचे राज्य मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने सांगितले.

भाजपाने सत्तांतराचा मुहूर्त जाहिर केला की पुढील काही दिवसात एखाद्या मंत्र्याच्या विरोधात भाजपाकडून आकांड तांडव करायला सुरुवात होते. सुरुवातीला महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाच भाजपाकडून लक्ष्य करण्यात आले. परंतु मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपाच्या हल्ल्याला तोंड देत त्यांचे हल्ले परतवून लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुख यांना टार्गेट करत थेट पोलिस अधिकाऱ्यांनाच हाताशी धरण्याचा प्रयत्न केला. अँटालिया प्रकरण पुढे आल्यानंतर यामध्ये सर्वात आधी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव पुढे करण्यात आले, त्यानंतर मनसुख हिरेन यांचे नाव आले याच कालावधीत या दोघांमधील फोनवरून झालेल्या संवादाचा सीडीआरही भाजपाकडून बाहेर काढण्यात आला. या प्रकरणाचा तपास एनआयएने हाती घेतल्यानंतर अद्याप तरी नवी माहिती बाहेर आली नाही. मात्र याच कालावधीत मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोप पत्रामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले. तत्पूर्वी परमबीर सिंग यांना बदलीची कुणकुण लागल्याने त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही नेत्यांची भेट घेवून बदली रोखण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आले नसल्याने त्यानंतर त्यांनी लेटरबॉम्बचा वापर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

या लेटरबॉम्बने राजकारणात चांगलीच खळबळ माजली. तो थंड होत नाही तोच लगेच आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेले फोन टॅपिंग प्रकरण पुढे आले. यात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाने केला. परंतु या अहवाल आणि पोलिस दलातील भ्रष्टाचार प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव तथा गृहविभागाचे तत्कालीन अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अहवाल सादर करत आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यानुसार पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याच नसल्याची बाब पुढे आली. त्यामुळे भाजपाला दोन-चार पावले मागे सरकावे लागल्याचे ते म्हणाले.

भाजपाकडून ज्या पध्दतीने या सर्व आरोपांच्या मालिकांची सुरूवात केली आहे, त्या अर्थी राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारी आणि राजकीय हालचालींची माहिती त्यांना चांगलीच होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच प्रत्येक मंत्र्यांच्या विरोधात आरोपांची जंत्री सुरु करण्याआधी भाजपाकडून पध्दतीशीरपणे वातावरण निर्मिती आणि त्यासंबधीच्या आरोपांची जमावाजमव केली जाते. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर शिवसेनेचे नेते तथा संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्या विरोधात आता भाजपाने दारूगोळा जमा करण्यास सुरुवात केली असून त्यांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराची माहिती एका ईमेल पत्त्यावरून सर्वांना पाठविण्यात येत आहे. मात्र त्या ईमेल पत्त्यावरून पाठविताना हि माहिती कोण पाठवित आहे त्याचा फोन नंबर, कार्यालयाचा पत्ता दिला जात नसल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपाकडून इतक्या मोठ्या प्रमाणावर जरी आरोप केलेले असले तरी महाविकास आघाडीकडून त्यावर मुद्दाम तात्काळ प्रतिक्रिया दिली जात नाही. त्यांच्या आरोपातील हवा मात्र आम्ही थंडपणाने काढून त्यातील सत्य राज्यातील जनतेसमोर मांडणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

Check Also

ऑलिंम्पिक-२०२० साठी महाराष्ट्रातील हे ८ जण देशाचे प्रतिनिधीत्व करणार राज्यातील निवड झालेल्या खेळाडूंना क्रीडा मंत्री केदार यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई : प्रतिनिधी टोकीयो ऑलिंम्पिक – २०२० साठी राज्यातील निवड झालेल्या ८ खेळाडूंनी आप-आपल्या खेळामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *