Breaking News

राज्यपालांनी अहवाल त्वरीत राष्ट्रपतींकडे पाठवावा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी
ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने राज्याच्या गृहमंत्र्यावर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे, सन्मानाचे धिंडवडे निघाले आहेत. या सर्व घटनांचा अहवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून मागवावा व त्याची सत्यता तपासून तो राष्ट्रपतींकडे पाठवावा, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये व माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते. या मागणीबाबत भाजपाचे शिष्टमंडळ बुधवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुनगंटीवार म्हणाले की, पोलीस महासंचालक दर्जाच्या एका पोलिस अधिकाऱ्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. या सर्व आरोपांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशामार्फत, सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली किंवा सीबीआयमार्फत चौकशी होणे अत्यावश्यक आहे. परमबीर सिंग यांनी यापूर्वीच वर्षा या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील प्रमुख मंडळींना या सर्व प्रकरणा संदर्भात माहिती दिल्याचे पत्रात नमूद केले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतल्याचे दिसून आलेले नाही. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत शासनाकडून खुलासा प्रसिद्ध कारण्याची तसदीही मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. सिंग यांनी तक्रार केलेल्या संबंधित मंत्र्यावर व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास मुख्यमंत्री असमर्थ ठरले आहेत, असे दिसते. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून या घटनांबाबत अहवाल मागवावा व त्याची सत्यता तपासून तो राष्ट्रपतींना पाठवावा.
गृहमंत्री देशमुख हे १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी पर्यंत क्वारंटाईन होते, असा खुलासा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांचा खुलासा धादांत असत्य आहे, हे दाखवून दिले आहे. आता तरी राष्ट्रवादीने गृहमंत्री देशमुख यांना निर्दोष ठरविण्याची घाई करू नये, असेही त्यांनी सांगितले. रविवारी शरद पवार आधी म्हणाले की, अनिल देशमुखांचा राजीनामा घेणे हा मुख्यमंत्र्यांचा विषय आहे. मात्र रात्री म्हणाले राजीनाम्याची आवश्यकता नाही, म्हणजे अनिल देशमुखांनी त्यांना धमकी तर दिली नाही ना? असे सवालही त्यांनी केला.
राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना बार व पब चालकांकडून वसुली करण्यास सांगितले होते. परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात केलेल्या आरोपांचे कोणत्याच पोलिस अधिकाऱ्याने अथवा बार चालकांनी खंडन केलेले नाही. एकीकडे बार चालकांकडून, मद्य विक्रेत्यांकडून वसुली करण्यास सांगितले जाते. दुसरीकडे सरकारने डिसेंबर २०२० मध्ये विविध मद्य विक्री परवान्यांवर ५० टक्क्यांची सूट दिली आहे. शेतकरी व सामान्य ग्राहकांना वीज बिल माफी केली नाही तसेच कोरोनाच्या कठिण काळात बाराबलुतेदार असो वा छोटे व्यवसायिक अशा समाजातील कोणत्याच घटकांना आर्थिक सहाय्य दिले नाही. मात्र बार चालकांना सूट दिली गेल्याचे त्यांनी नमूद केले.

Check Also

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *