Breaking News

‘मिठी’ होणार गटारमुक्त पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी

गाळ काढणे, तरंगता कचरा वेगळा करणे तसेच आजूबाजूने येणारे घाण पाणी रोखणे या तीन टप्प्यांमध्ये काम करून ‘मिठी’ ला नदीचे मूळ स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याकामी सर्वांचे सहकार्य गरजेचे असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

मिठी नदी स्वच्छतेच्या पायलट प्रकल्पाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास आदी उपस्थित होते.

एमएमआरडीए आणि मरीन डेब्रिज पार्टनरशिप यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार आज हा प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पात नदीतील तरंगता कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण केले जाईल. याद्वारे नदीमार्गातून समुद्रात जाणारा प्लास्टिक आणि इतर तरंगता कचरा कमी केला जाणार आहे.

मागील काही वर्षात मिठी नदीला नाल्याचे स्वरूप आले आणि पावसाळ्यात नागरी वस्तीला धोका निर्माण झाला. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे किनाऱ्यावरील नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. मिठी नदीची स्वच्छता हा एक नियमित प्रक्रियेचा भाग आहे, तथापि आता त्यावर भागणार नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने आणि मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी नाल्याचे स्वरूप आलेल्या मिठीला पुन्हा नदीचे स्वरूप प्राप्त करून देणे गरजेचे आहे, असे ते म्हाणाले.

नदीतील गाळ काढणे, तरंगता कचरा वेगळा करणे आणि आजूबाजूच्या परिसरातून येणारे घाण पाणी रोखणे या तीन टप्प्यांवर काम करणे आवश्यक आहे. किनाऱ्यावरील नागरिकांची काळजी घेऊन हे काम करावे लागणार असल्याने थोडा वेळ लागला तरीही मिठी कायमस्वरूपी स्वच्छ व्हावी यासाठी नागरिकांचे सहकार्यही महत्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने मिठीला स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्यापासून सुरूवात करून शासकीय यंत्रणांच्या प्रयत्नांना सहकार्य करावे. वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर जगभर समस्या निर्माण होत आहेत. महाराष्ट्रातही याचा परिणाम दिसून येत असून हे आपल्याला परवडणारे नाही. त्यामुळे पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने आपल्या वसुंधरेचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा असे आवाहनही त्यांनी केले.

महापौर पेडणेकर यांनी, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मिठी नदीतील गाळ काढण्यात येत असून महानगरपालिका नागरिकांच्या सोयीसाठी अत्यावश्यक बाबी करीत राहील, अशी ग्वाही दिली. नदीच्या पुनरुज्जीवनासाठी एमएमआरडीए आपल्यामार्फत सर्व ते प्रयत्न करील, असे आयुक्त श्रीनिवास यांनी सांगितले. यावेळी मिठी नदीच्या स्वच्छता प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.

Check Also

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *