मुंबई विद्यापीठातील शिक्षकांची रिक्त पद, महाविद्यालयांचा नामांकनाचा विषय, एमएमआरडीएकडून विद्यापीठ परिसरात रखडलेली विकासकामे आदी मुंबई विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत शासन दरबारी मांडून त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.
आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना कँम्पस येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सिनेट सदस्यांसोबत भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली.
कलिना कँम्पस येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी उभारण्यात येणाऱ्या इमारती,परिसराचे सुशोभिकरण आदी कामांसाठी मुंबई विद्यापीठ आणि एमएमआरडीएमध्ये करार झाला होता. मात्र ही कामे रखडली असून ती कधी पूर्ण होणार याची स्थिती जाणून घेतली.
कलिना कँम्पस येथे दररोज ५ ते ६ हजार विद्यार्थी विविध शैक्षणिक कामासाठी येत असतात. या परिसरात बाहेरून समाज विघटक येऊन मुलींवर अत्याचार केल्याच्या घटना घडल्या असताना कलिना कँम्पसच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेली बिट चौकी रस्ता रुंदीकरण नावाखाली पाडण्यात आली. यामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची स्थिती सिनेट सदस्य शीतल देवरूखकर – शेठ यांनी मांडली.
शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना विद्यापीठातील शिक्षक भरती रद्द करण्यात आल्याच्या प्रश्नाकडे सिनेट सदस्य मिलिंद साटम यांनी लक्ष वेधले.
यावर अंबादास दानवे म्हणाले की, मुंबई विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय नामांकनाचा दर्जा प्राप्त झालेला असताना विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या असुविधेकडे होत असलेले दुर्लक्ष ही खेदजनक बाब आहे. देशातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थी तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. त्यामुळे येथील असुविधेबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचेही यावेळी सांगितले.
यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, प्र कुलगुरू अजय भामरे, स्थानिक आमदार विलास पोतनीसजी,डॉ नंदकिशोर मोतेवार, विभाग प्रमुख डॉ. महेश पेडणेकर, सिनेट सदस्य शीतल देवरूखकर – शेठ , मिलिंद साटम, किसन सावंत, अल्पेश भोईर, परम यादव, डॉ.धनराज कोहचाडे, आदी उपस्थित होते.