Breaking News

मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांना केंद्राने घेतले स्वत:च्या अखत्यारीत ऐन महापालिका निवडणूकीच्या तोंडावर तडकाफडकी बदली

मुंबईसह राज्यातील १४ महापालिकेच्या निवडणूकीच्या हालचाली सुरू झालेल्या असताना मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांची तडकाफडकी केंद्र सरकारने बदली करत केंद्र सरकारच्या एका विभागात सचिव पदी वर्णी लावण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे कोरोना काळात आयुक्त चहल यांनी केलेल्या कामाचे कौतुक देशभरासह आंतरराष्ट्रीयस्तरावरही झाले होते. त्यामुळे त्यांची अशा पध्दतीने बदली केंद्र सरकारकडून होईल असे वाटत नसतानाच ही बदली करण्यात आली आहे.

याबाबत इक्बाल सिंह चहल यांना विचारले असता म्हणाले की, मला हे सांगताना आनंद होत आहे की, भारत सरकारने मला केंद्रात सचिव पदाचा दर्जा दिला आहे. आयएएस अधिकाऱ्याच्या कारकिर्दीतील या पदावर नियुक्ती ही सर्वाधिक अभिमानाची बाब आहे.
इक्बाल सिंह चहल हे १९८९ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. ८ मे २०२० साली त्यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.

यापूर्वी त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी नगरविकास विभागात प्रधान सचिव म्हणून देखील काम केलं आहे. ते जलसंपदा विभागाचे सचिव म्हणूनही कार्यरत होते. धारावी झोपडपट्टीच्या विकासात चहल यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
तसेच औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं आहे. याशिवाय त्यांनी म्हाडाचं अध्यक्षपद आणि उत्पादन शुल्क आयुक्त म्हणूनही काम केलं आहे.

इक्बाल सिंह चहल यांनी कोरोना संसर्गाच्या काळात मुंबईतील स्थिती अंत्यंत संयमाने हाताळली आहे. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने कोरोना विषाणूचा सर्वात जास्त धोका या शहराला होता. पण चहल यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेनं उत्कृष्ट काम केलं आहे. धारावी सारख्या झोपडपट्टीत देखील करोना विषाणूचा फैलाव रोखण्यात मुंबई महापालिकेला यश आलं आहे. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेनं देखील घेतली होती.
मात्र आता केंद्र सरकारने त्यांना थेट सचिव पदाचा दर्जा देत केंद्रात नियुक्ती दिली आहे. महाराष्ट्रातील चांगल्या अधिकाऱ्यांना थेट केंद्रात काढून घेण्याचे धोरण केंद्र सरकारकडून सातत्याने राबविले जात आहे.

त्यामुळे महाविकास आघाडी सरकार विरूध्द मोदी सरकार यांच्यातील संघर्षात आता अधिकारीही पळविण्याचा प्रकार सुरु तर नाही ना? अशी चर्चा राज्याच्या प्रशासनात सुरु आहे.

Check Also

वडापावच्या गाडीवर कारवाई; कष्टकऱ्यांची मंत्रालयातील जाळीवर मारली उडी

एकाबाजूला केंद्र आण राज्य सरकारकडून २८ कोटीपैकी २२ कोटी नागरिकांना विविध गरिबीरेखेच्या बाहेर काढले. तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *