Breaking News

वर्षा गायकवाड यांचा सवाल,… मुंबईकरांच्या आरोग्यासाठी निधी नाही? मुंबईकरांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवून बीएमसी रुग्णालयातील औषध पुरवठा तातडीने पुर्ववत करा

बृहन्मुंबई महानगरपालिका रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांची १२० कोटी रुपयांची बिले सरकारने थकवल्याने औषध पुरवठा थांबवण्यात आल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. बीएमसीकडे अथवा राज्य सरकारकडे पैसे नाहीत हे पटणारे नाही. जाहिरातबाजीवर उधळपट्टी करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे मात्र मुंबईकरांच्या आरोग्यासाठी पैसा नाही का? असा संतप्त सवाल करत मुंबईकरांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवून बीएमसी रुग्णालयातील औषध पुरवठा तातडीने पुर्ववत करा, असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपा सरकारचा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, औषध पुरवठा बंद केल्याने महापालिका रुग्णालये अक्षरशः व्हेंटिलेटरवर आहेत. आपल्या लाडक्या कंत्राटदारांसाठी बीएमसीची तिजोरी खाली करणाऱ्या राज्य सरकारकडे मुंबईकरांच्या आरोग्य आणि मूलभूत सुविधांसाठी मात्र निधी नाही, हे कसे? निवडणुकीपूर्वी ‘शून्य प्रिस्क्रिप्शन धोरण’ लागू करण्याच्या बाता मारणाऱ्या भाजपा युती सरकारला आपल्या घोषणांचा विसर पडला आहे. सरकारने तातडीने लक्ष घालून आधी औषध पुरवठादारांचे थकवलेले कोट्यवधी रुपये देऊन औषध पुरवठा पुर्ववत सुरु करावा, अशी मागणीही यावेळी केली.

शेवटी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपा युती सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्य मुंबईकर त्रस्त झाला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारून शहर सौंदर्यीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. जनतेच्या कष्टाचा पैसा अशापद्धतीने उधळला जातो पण मुंबईकरांच्या आरोग्यासाठी मात्र पैसा नाही हे दुर्दैवी व मुंबईकरांवर अन्याय करणारे आहे. औषध पुरवठा पुन्हा सुरु करण्याची जबाबदारी राज्य सरकार व बीएमसीची आहे. सरकारला जनाची नाही तर मनाची असेल तर, हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी अपेक्षाही यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *