भाजपा युती सरकारचा सर्वसामान्य मुंबईकरांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे. पुनर्बांधणीसाठी सायन पूल बंद करून ५ महिने उलटले तरी अजून काम सुरू झालेले नाही, त्यामुळे स्थानिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक व शाळकरी मुलांना अरुंद आणि असुरक्षित पदपथावरून जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. स्थानिक मुंबईकरांचे होणारे हाल रेल्वे प्रशासन, बीएमसी व राज्य सरकारला दिसत नाहीत. सर्वसामान्य मुंबईकरांच्या हिताचा विचार करुन सायन पुलाचे कामकाज तातडीने सुरू करून वेगाने पूर्ण करावे, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
मुंबईतील महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करुन तोडगा काढण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात असे म्हटले आहे की, सायन पुलाचे कामकाज तातडीने सुरू करून ते वेगाने पूर्ण करावे. लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवासी सोयी-सुविधा वाढवण्यात याव्यात. पिण्याच्या पाण्याची सोय, कायम स्वरूपी रिक्षा-टॅक्सी स्टॅंड, सार्वजनिक सुलभ शौचालय सुविधा उपलब्ध कराव्यात. कुर्ला (पू.), साबळेनगर परिसरातील रेल्वे हद्दीत जीर्ण अवस्थेत असलेली धोकादायक इमारत पाडण्यात यावी. कुर्ला (पू.) रेल्वे आरक्षण केंद्रावर ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग बांधव, कर्करोगग्रस्त आदींच्या सोयीसाठी विशेष तिकीट खिडकी असावी. बरमासेल रेल्वे लाईन लगतच्या झोपडपट्टीवासियांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे. स्थानिक नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मागील ७० वर्षांपासून पोल क्र. १०/३ नजीक वापरात असलेली रेल्वे क्रॉसिंगची सुविधा ही पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत सुरू ठेवण्यात यावी. क्रांतीनगर वसाहतीचा पुनर्विकास आणि त्याठिकाणी संरक्षण देण्यात यावे. कुर्ला (पू.), कुरेशीनगर येथे प्राधान्याने पादचारी पूल बांधावा. गुरु तेग बहादूर नगर, सायन कोळीवाडा येथील पुलावरील लोखंडी भिंतीचे बांधकाम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे. मुंबई ते तिरुनेलवेली दरम्यान रेल्वे सेवा सुरु करावी.
यासंदर्भात अधिक माहिती देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन ही आता ‘डेथलाईन’ ठरत आहे. दिवसाला सरासरी ७ जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू होत आहे यावर रेल्वे प्रशासनाने तत्काळ पावलं उचलणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रत्येक रेल्वे स्थानक परिसरात आपत्कालीन रुग्णवाहिका सुविधा असायला हवी. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील तसेच रेल्वेच्या अखत्यारित येणाऱ्या विविध समस्या रेल्वे व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगितले.