Breaking News

वर्षा गायकवाड यांचा सवाल, ४०० वर्षांचे चिंबई गावठाण झोपडपट्टी कसे? मुंबईच्या गावठाण आणि कोळीवाड्यांची ओळख नष्ट करण्याचे भाजपा युती सरकाचे षडयंत्र

राज्यातील भाजपा युती सरकार हे लाडक्या बिल्डर मित्रांसाठी काम करते हे नवे नाही पण उद्योगपती, बिल्डर धार्जिणे भाजपा युती सरकार आता भूमिपुत्रांच्या हक्कावर गदा आणत आहे. एका बिल्डर मित्राच्या फायद्यासाठी वांद्र्यातील ४०० वर्षे जुन्या चिंबई गावठाणला झोपडपट्टी घोषित करण्यात आले आहे. मुंबईच्या भूमिपुत्रांना बेदखल करण्याचे हे षडयंत्र असून बिल्डर मित्रांच्या स्वार्थासाठी मुंबईच्या मूळ नागरिकांना झोपडपट्टीवासी ठरवता का ? असा संतप्त सवाल करून मुंबईच्या गावठाण आणि कोळीवाड्यांची ओळख नष्ट करु देणार नाही, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला.

यासंदर्भात बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपा सरकारने वांद्र्यातील रहिवाशांना १३ फेब्रुवारी पासून एसआरए SRA अंतर्गत पुनर्विकास सर्वेक्षणासाठी नोटिसा पाठवल्या आहेत, हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. या घोटाळ्याविरुद्ध रहिवाशांनी एकत्र येऊन लढा उभारला आहे आणि काँग्रेस पक्ष या लढ्यात भूमिपुत्रांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. सरकारने एसआरए SRA सर्वेक्षण त्वरित रद्द करावे, मुंबईतील कोणत्याही गावठाण किंवा कोळी वाड्यांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना लागू करू नये. मुंबईतील सर्व गावठाण आणि कोळीवाड्यांचे मॅपिंग विकास आराखड्यात करावे. गावठाण आणि कोळीवाड्यांची ऐतिहासिक ओळख कायम ठेवत नियोजित पुनर्विकासासाठी तातडीने धोरण जाहीर करा अशा मागण्याही यावेळी केल्या.

शेवटी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपा सरकार आधीच मुंबईतील महत्वाचे व मोक्याचे भूखंड फुकटात अदानीच्या खिशात घालत आहे. आता या भ्रष्ट भाजपा युती सरकारची नजर भूमिपुत्रांच्या जमिनीवर पडली असून त्यांना बेदखल करण्याचे काम केले जात आहे. काँग्रेस पक्षाने मुंबईकरांच्या हक्कासाठी नेहमीच पुढाकार घेतला असून मुंबईकरांच्या हक्कासाठी कोणताही लढा देण्यास काँग्रेस पक्ष तयार आहे. वांद्र्यातील भूमिपुत्रांच्या हक्कासाठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरून लढा देऊ, असा इशाराही दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *