Breaking News

वर्षा गायकवाड यांचा आरोप, भाजपा सरकारची सर्व मदत ‘लाडक्या अदानीसाठी’ मदर डेअरतील आगीची घटनाही संशयास्पद

कुर्ल्यातील मदर डेअरीच्या जमिनीची मोजणी पोलीस फौजसाठ्यासह सक्तीने सुरू मोदानी आणि कंपनीला मुंबई लुटू देणार नाही; मुंबईचा स्वाभिमान व अस्मितेसाठी काँग्रेस सर्वशक्तीने लढा देईल असा इशारा देत मुंबईतील जमीन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लाडका उद्योगपती अदानीच्या घशात घालण्यासाठी फडणवीस शिंदे पवार सरकार तत्परतेने कामाला लागले आहे. मुंबईचे लचके तोडणा-या अदानीच्या फायद्यासाठी सरकार पोलिस बंदोबस्तात रस्तावर उतरले आहे. कुर्ल्यातील नेहरूनगर येथील पर्यावरणदृष्टीने संवेदनशील मदर डेअरीच्या जमिनीची साफसफाई आणि मोजणी सक्तीने सुरू करण्यात आली आहे. अदानीला मुंबई गिळायची आहे आणि त्यासाठी मोदानी सरकारची वाटेल त्या थराला जाण्याची भूमिका असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.

पुढे बोलताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, पर्यावरणीय दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील असणारी कुर्ला येथील मदर डेअरीची जागा भाजपा सरकारला काहीही करून अदानीच्या घशात घालायची आहे. त्यासाठी या महाघोटाळ्याच्या विरोधात भक्कमपणे उभ्या राहिलेल्या लोकचळवळीला चिरडण्याचीदेखील सरकारची तयारी आहे. केवळ अदानीच्या फायद्यासाठी लोकभावनेच्या विरोधात जाऊन पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह सरकारने बळजबरीने मदर डेअरीच्या जमिनीची मोजणी सुरू केली आहे. या भूखंडावर ८०० ते ९०० मौल्यवान झाडे आहेत, ज्यामुळे हा परिसर पर्यावरणपूरक आणि संवेदनशील आहे. मात्र, आरे प्रकरणाप्रमाणेच जमिनीच्या साफसफाईच्या नावाखाली रविवारी सुट्टीच्या दिवशीही या झाडांची निर्दयीपणे कत्तल सुरू आहे. मदर डेअरीची जमीन अदानीच्या फायद्यासाठी हस्तांतरित करण्याचा सरकारचा मनसुबा स्पष्ट दिसत असल्याचा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, दडपशाहीचा कळस म्हणजे या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या नेहरू नगरमधील नागरिकांना निदर्शने करण्यापासून रोखले जात आहे. या भागाला पोलिसांनी छावणीचे स्वरूप दिले आहे आणि आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपूर्वी मदर डेअरीच्या रिकाम्या इमारतीला लागलेल्या संशयास्पद आगीनेही अनेक प्रश्न निर्माण केले असल्याचा संशयही व्यक्त केला.

वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी लोकचळवळीची दिशाभूल करण्यासाठी सरकारने जागा हस्तांतरण प्रक्रियेला स्थगिती दिली असल्याचे जागोजागी बॅनर लावले होते. आता निवडणुका संपल्या, भाजपा शिंदेसेनेचे सरकार आले आणि या सरकारने आपले खरे रंग दाखवले. आता कुठे आहेत कुडाळकर? कुठे आहेत एकनाथ शिंदे? असा सवालही यावेळी केला.

शेवटी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपा युती सरकारला जनतेचे अथवा पर्यावरणाचे काहीही देणेघेणे नाही.धारावी, मुलुंड, मालाड किंवा कुर्ला येथील जमीन असो, अदानींसाठी या भ्रष्ट सरकारने वारंवार लोक आंदोलने दडपण्याचा आणि मुंबईचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. पण काँग्रेस गप्प बसणार नाही, मोदानी कंपनीला मुंबई लुटू देणार नाही असा इशाराही यावेळी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *