सालियन कुटुंबाने केलेल्या तक्रारीच्या आधारे महिला आयोगाने दिलेल्या आदेशान्वये मालवणी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु या गुन्ह्याच्या विरोधात राणे पिता-पुत्राने दिंडोशी न्यायालयात धाव घेतली असता न्यायालये त्यांना १० मार्चपर्यंत अटक करता येणार नाही असे निर्देश देत संरक्षण दिले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिशा सालियन मृत्यू प्रकरणी अनेक वादग्रस्त विधाने करत आरोप केले. तर नितेश राणे यांनी ट्विट करत काही वादग्रस्त विधाने केली. यासंदर्भात दिशाची आई वासंती सालियन यांनी मालवणी पोलिसात राणे पिता-पुत्राविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
राणेंविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी हे करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच गुन्ह्याच्या चौकशीसह जबाब नोंदविण्यासाठी नितेश राणे आणि नारायण राणे यांना नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसीविरोधात राणेंनी दिंडोशी न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने या दोघांना १० मार्चपर्यंत दिलासा दिला.
१९ फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशाबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. तसेच नितेश यांनीही अशाच पद्धतीची वक्तव्ये केली होती. याच प्रकरणात आता या दोघांची शनिवारी ५ मार्चला मालवणी पोलीस ठाण्यात चौकशी होणार आहे.
मंगळवारी १ मार्च, २०२२ रोजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित आयटी परिषद पार पडली. त्यानंतर बोलतानाही राणे यांनी दिशा सालियान प्रकरणावरुन शिवसेना नेत्यांवर टीका केली. दिशा सालियान प्रकरणात सत्य समोर आल्यास शिवसेनेचा मोठा नेता कारागृहात जाईल. त्यामुळे प्रकरण फिरवण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
