Breaking News

जी-२० प्रतिनिधी, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून जुहू समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता स्वच्छता अभियानामध्ये लोकचळवळीची आवश्यकता-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जी-२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘जी-२० समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्राचे किनारा स्वच्छ ठेवण्याची तसेच प्रदूषण व कचऱ्यापासून समुद्राचे रक्षण करण्याची शपथ देवून स्वत: जी-२० परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमवेत स्वच्छता केली. स्वच्छता अभियानामध्ये लोकचळवळीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

जुहू बीच येथे आयोजित या मोहिमेत केंद्रीय पर्यावरण व वने मंत्री भुपेंद्र यादव यांनीही उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, प्रधान सचिव प्रविण दराडे, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आदी उपस्थित होते.

जी-२० परिषदेतील विविध देशांच्या प्रतिनिधींचे स्वागत करुन मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई हे गतिशील शहर असून देशाचे ग्रोथ इंजिन असलेले शहर आहे. मातृभूमी संरक्षणाचा संदेश संत ज्ञानेश्वरांनी दिला आहे. मातृभूमी ही मानवी जीवनासाठी वरदान असून आपण त्याचे रक्षणकर्ते आहोत. त्यासाठी आपल्या आयुष्यातील प्रत्येक कार्य पर्यावरणपूरक असावे, असा संदेश या स्वच्छता मोहिमेतून पोहोचावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. त्यानंतर या अभियानाने जनआंदोलनाचे रुप घेतले आहे. देशातील प्रत्येक गाव, शहर स्वच्छतेच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. राज्य शासनानेही पर्यावरण संवर्धनासाठी महत्वपूर्ण उपक्रम सुरु केले असून त्यासाठी पाऊले उचलली आहेत. यात मोठ्याप्रमाणात लोकसहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

भारताला जी-२० चे यजमानपद मिळणे ही अभिमानाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर आणण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे. ही गर्वाची बाब आहे. राज्य शासनाला केंद्र सरकारचे सहकार्य नेहमी मिळत आहे. त्यातून राज्याला विकासाकडे नेण्याचा प्रयत्न राज्य शासन करत आहे, असेही मु्ख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

बीच स्वच्छ आहे ना ? मुख्यमंत्र्यांचा नागरिकांशी संवाद

जुहू बीच येथे आयोजित ‘जी-२० मेगा बीच क्लीन अप’ मोहिमेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीचवर येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. बीच स्वच्छ आहे ना ? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला असता ‘होय, आम्ही रोज याठिकाणी येत असतो’ असा प्रतिसाद नागरिकांनी दिला. तुमच्या काही सूचना असतील तर त्या नक्की कळवाव्यात, असे आवाहन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी नागरिकांना केले.

नागरिकांनी एक मिनिट स्वच्छतेसाठी द्यावा

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वच्छता मोहिमांसारख्या उपक्रमांची गरज आहे. स्वच्छतेसाठी प्रत्येकाने आपल्या जीवनातील एक मिनिट वेळ दिला पाहिजे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल आणि ऱ्हास कमी होईल. ग्लोबल वॅार्मिंग आणि वातारणातील बदलामुळे भेडसावणाऱ्या समस्यांपासून दिलासाही मिळेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना सांगितले.

Check Also

ऐन निवडणूकीच्या धामधुमित सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारातील काँग्रेस आणि भाजपामधील आरोपा प्रत्यारोपामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *