Breaking News

आता काँग्रेसचे राज्य सरकारच्या विरोधात ‘चिपकू’ आंदोलन आरे मेट्रो कारशेडच्या विरोधात आंदोलन करणार

मेट्रो-३ च्या मार्गिकेसाठी उभारण्यात येणाऱ्या मेट्रो कारशेडचा तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा निर्णय सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने रद्दबातल केला. तसेच मेट्रोचे कारशेड कांजूर मार्ग नव्हे तर आरेतच होणार असल्याचे जाहिर केले. या निर्णयाच्या विरोधात आज ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार होते. मात्र हे आंदोलन कॅडबरी जंक्शन येथे करण्यात आले. यावेळी पोलिसांनी २५ ते ३० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र लवकरच आरेला वाचविण्यासाठी चिपकू आंदोलन कऱण्यात येणार असल्याचे काँग्रेसकडून जाहिर करण्यात आले.

आरे जंगलात मेट्रो कारशेडला विरोध होत असताना काँग्रेसच्या पर्यावरण विभागाने आज ठाण्यात ‘आरे वाचवा’ आंदोलन केले. सुरूवातीला हे आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर होणार होते. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे ठाण्याच्या कॅडबरी जंक्शन येथे हे आंदोलन करण्यात आले. तुघलकी निर्णय घेणाऱ्या ईडी सरकारविरोधात आंदोलन सुरुच राहिल, अशी आक्रमक प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांनी दिली.

ईडी सरकारचा निषेध असो अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. आरे वाचवण्यासाठी आगामी काळात काँग्रेसकडून झाडांना मिठी मारून ‘चिपकू’ आंदोलन करण्यात येणार आहे. आरे कारशेड विरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या तयारीत काँग्रेस आहे. आरे कारशेडला मोठा विरोध असतानाही राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) आरेच्या जंगलातील कारशेडवर ठाम आहे. त्याचा विरोध करण्यासाठी पर्यावरण संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

मुंबईची फुप्फुसे असलेले आरेचे जंगल हे भविष्यातही जंगलच राहावे आणि आरेमधील मेट्रो कारशेड रद्द व्हावे, यासाठी पर्यावरणप्रेमी आग्रही आहेत. मुंबई शहराच्या मध्यभागी मुंबईकरांना प्राणवायूचा पुरवठा करणारे पर्यावरणाचे महत्त्व जपणारे, जैवविविधतेने नटलेले आरेचे जंगल आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरे जंगलाची निवड करण्यात आली होती. ४ ऑक्टोबर २०१९ रोजी पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनानंतरही रात्रीच्या अंधारात हजारो वृक्षांची अमानुषपणे कत्तल करण्यात आली. वृक्ष वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात आले. या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री होते. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कारशेडची जागा बदलून आरे हे जंगल म्हणून घोषित केले होते. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच त्यांनी आरे जंगलातील मेट्रोच्या कारशेडची जागा बदलली जाणार नाही असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारमधील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईच्या पर्यावरणाचा समतोल राखला जाईल असे आश्वासन देत पर्यावरण वाद्यांनी आंदोलन मागे घ्यावे आणि मुंबईकरांच्या मेट्रोचा प्रवास मोकळा करावा असे आवाहन केले.

Check Also

वडापावच्या गाडीवर कारवाई; कष्टकऱ्यांची मंत्रालयातील जाळीवर मारली उडी

एकाबाजूला केंद्र आण राज्य सरकारकडून २८ कोटीपैकी २२ कोटी नागरिकांना विविध गरिबीरेखेच्या बाहेर काढले. तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *