Breaking News

युपीएससी निकालात मुलींचा डंका, तर राज्यात ठाण्याची कश्मिरा संख्ये सर्वप्रथम उत्तीर्ण होण्यात मुलींची संख्या जास्त

केंद्रीय लोकसेवा आयोगाने अर्थात यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२२ चा अंतिम निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. त्यात इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक मिळवला असून, अंतिम निकालात राज्यातील उमेदवारही यशवंत ठरले आहेत. महत्त्वाचे म्हणजे पहिल्या दहा क्रमांकामध्ये सहा मुली तर चार मुले आहेत. परीक्षेचा निकाल http//www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा, केंद्रीय सेवा गट अ, गट ब अशा पदांसाठी नागरी सेवा परीक्षा २०२२ घेण्यात आली होती. यूपीएससीने जाहीर केलेल्या निकालात पहिल्या दहा क्रमांकामध्ये सहा मुली तर चार मुले आहेत. त्यात इशिता किशोर, गरिमा लोहिया, उमा हरती एन, स्मृती मिश्रा, मयूर हजारिका, गहना नव्या जेम्स, वसीम अहमद भट, अनिरुद्ध यादव, कनिका गोयल, राहुल श्रीवास्तव हे विद्यार्थी अनुक्रमे पहिल्या दहा क्रमांकावर आहेत.

एकूण प्रसिद्ध झालेल्या ९९३ नावांमध्ये पहिल्या टॉप टेनमध्ये सहा मुली आहेत. तर, राज्यातून ठाण्यातील कश्मिरा संखे प्रथम आली आहे. तर, वसंत दाभोळकरने (७६ वा क्रमांक), प्रतिक जराड (१२२), जान्हवी साठे (१२७), गौरव कायंदे-पाटील (१४६) तर ऋषिकेश शिंदे (१८३) उत्तीर्ण झाले आहेत.

महाराष्ट्रातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे

१. कश्मिरा संख्ये (२५), २. वसंत दाभोळकर (१२७), ३. गौरव कायंदे-पाटील (१४६), ४.ऋषिकेश शिंदे (१८३), ५. अभिषेक दुधाळ (२८७), ६. श्रुतिषा पाताडे (२८१), ७. स्वप्नील पवार (२८७), ८.अनिकेत हिरडे (३४९)

दरम्यान, ठाण्याची कश्मिरा संख्ये ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. तिचा देशपातळीवर रँक २५ आहे. या निकालानंतर कुटुंबियांनी कश्मिराला पेढा भरवत आनंद साजरा केला.

कश्मिरा संख्ये म्हणाली, मी निकालाकडून काही अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. मात्र, आशा नक्कीच होती. जेव्हा निकाल लागला तेव्हा काहीवेळ विश्वास बसत नव्हता. ही प्रोव्हिजनल लिस्ट नसून रँकर्स लिस्ट आहे ना याची मी खात्री करून घेतली, तेव्हा मला विश्वास बसला की माझा देशात २५ वा रँक आहे.

लहानपणापासून मी यूपीएससीचं स्वप्न पाहिलं होतं. माझी आई मला किरण बेदींच्या बातम्यांची कात्रणं दाखवायची. तेव्हापासून नागरी सेवा परीक्षांची तयारी करण्याचा विचार होता. माझं पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईत झालं. मी मुंबईतील शासकीय डेंटल कॉलेजमधून डेंटल सर्जरीमध्ये पदवी घेतली. पुढे डेंटिस्ट म्हणून काम करत असताना वाटलं की, मी नागरिकांच्या आरोग्यावर काम करते आहे, मात्र नागरी सेवेतून मी मोठ्या प्रमाणात काम करू शकते. तेव्हापासूनचा निश्चय आताही ठाम असल्याचे कश्मिरा संख्येने सांगितले.

कश्मिरा संख्य़े पुढे म्हणाले, माझा पर्यायी विषय ‘अँथ्रोपोलॉजी’ होता. मी वैद्यकीय शिक्षण घेतलं असल्याने अँथ्रोपोलॉजीत अनेक विषयांची पुनरावृत्ती होते. मी जसजसा या विषयाचा अभ्यास करत गेले तसतसा मला हा विषय समाज आणि संस्कृतीबाबत अधिक महत्त्वाचा असल्याचं जाणवलं. माझा या विषयातील रस वाढत गेला आणि मी याच विषयाला माझा पर्यायी विषय म्हणून निवडलं.

मी २०२० पासून या परीक्षेसाठी तयारी सुरू केली. हा माझा तिसरा प्रयत्न होता. मागील दोन प्रयत्नात मी प्रिलीम परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नव्हते. यावेळी सर्वच पातळ्यांवर मला यश मिळालं. माझं पहिलं प्राधान्य आयएएस आहे, दुसरं प्राधान्य आयएफएस आहे. मला महाराष्ट्रात काम करायला मिळालं तर आवडेल. कारण मला इथली भाषा आणि संस्कृती माहिती आहे, असंही कश्मिराने नमूद केलं.

Check Also

निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *