Breaking News

दिवा वासियांसाठी खुषखबर; पाणी प्रश्न निकाली, वाढवून मिळणार आता सहा दशलक्ष लीटर पाणी मिळणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु झालेली असतानाच आणि आगामी ठाणे महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिवा वासियांना सातत्याने भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार आहे. दिवावासियांना मिळणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात आली असून सहा दशलक्ष लीटर पाणी वाढीव स्वरूपात देणार आहे. तसेच हे वाढीव पाणी मंगळवारपासून मिळणार असल्याची घोषणा नगरविकास मंत्री तथा ठाणे महानगरपालिकेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

वास्तविक पाहता त्यांनी एक तातडीची बैठक आयोजित करत त्यात दिवावासियांसाठी पाणी पुरवठा वाढवून घेतला. तसेच कल्याण-डोंबिवली आणि २७ गावांच्या पाणी प्रश्नासंदर्भात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी मंगळवारी संयुक्त पाहणी दौरा करून पालकमंत्री शिंदे यांना अहवाल सादर करणार आहेत.

दिवा भागात गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी मोर्चे निघत आहेत. पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनावर टिका होत आहे. पाणी टंचाई संदर्भात भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण, संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी आयुक्तांची भेट घेतली होती. तर दोन दिवसांपुर्वी मनसे आमदार प्रमोद पाटील यांनी आयुक्तांची भेट घेऊन पाणी टंचाई समस्या सोडविण्याची मागणी केली होती.
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून भाजप आणि मनसेने रान उठवित शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. असे असतानाच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने एक बैठक घेऊन दिव्याला अतिरिक्त पाणी देण्याचा निर्णय घेतला. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र, तसेच ठाणे महापालिकेच्या दिवा भागातील पाणी पुरवठा संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने ही बैठक पार पडली.

या बैठकीला उद्योग मंत्री सुभाष देसाई हे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकांचे अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हे उपस्थित होते.

दिवा भागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता १० दशलक्षलीटर पाणी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार साडे तीन दशलक्षलीटर इतके पाणी उपलब्ध झाले असून एमआयडीसीने उर्वरित साडे सहा दशलक्षलीटर पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी खासदार शिंदे यांनी यावेळी केली. त्यानुसार अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्यासंबंधीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठविण्याचे निर्देश मंत्री शिंदे यांनी ठाणे महापालिकेला यावेळी दिले.

तसेच अतिरिक्त पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. त्यावर तत्काळ पाणी सोडण्याचे निर्देश दिले असल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी बैठकीत सांगितले. कल्याण-डोंबिवलीसह २७ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. या संदर्भात खासदार शिंदे यांच्यासह ठाणे जिल्हाधिकारी, कल्याण डोंबविली महापालिकेचे अधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांनी मंगळवारी संयुक्त पाहणी करून अतिरिक्त पाणी पुरवठ्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

Check Also

महाराष्ट्रातील या ११ पोलिसांना “केंद्रीय गृहमंत्र्यांचे उत्कृष्ट तपास पदक” “केंद्रीय गृहमंत्री तपासात उत्कृष्टता पदकां”ची घोषणा

सन २०२२ च्या “केंद्रीय गृहमंत्री तपासात उत्कृष्टता पदकां”ची घोषणा करण्यात आली. पदक विजेत्यांमध्ये  महाराष्ट्रातील ११ पोलीसांचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सन २०२२ साठी उत्कृष्ट तपासासाठीचे “केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्टता …

Leave a Reply

Your email address will not be published.