Breaking News

ठाकरे गटाचे खासदार राऊत यांचा पलटवार,… एकनाथ शिंदेंना स्मृतीभ्रंश झाला एकनाथ शिंदे यांना ठाकरे नावाची कावीळ झालीय

शिवसेना ठाकरे गटाचे  खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडताना म्हणाले, मिंधे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे या नावाची कावीळ झाली आहे. मोदीभक्त झालेल्या शिंदे गटाला आता उद्धव ठाकरेंवर आणि आमच्या पक्षावर टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही. आरएसएसकडून स्क्रिप्ट लिहून दिली जाते, ते वाचण्याचं काम केलं जातं, असा उपरोधिक टोला विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

विनायक राऊत हे एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

नव्या संसद भवनाच्या कार्यक्रमावर शिवसेनेसह ( ठाकरे गट ) विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला आहे. यावरून ‘जनता त्यांच्या पोटदुखीला चांगला जमालगोटा देऊन त्यांची पोटदुखी दूर करेल,’ असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला होता. याला विनायक राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्हाला जमालगोटा देण्याचं सोडा, रत्नागिरीत ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाची सभा झाली. या सभेतून लोक निघून गेले, त्यावर दृष्टी फिरवली, तर लोकांत आपलं स्थान किती, हे कळलं असतं, असा टोमणा राऊतांनी लगावला.

वीर सावरकर जयंती निमित्त संसद भवनाचा कार्यक्रम घेतला म्हणून विरोधकांना वावडं का?, असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केलाय. याबद्दल विचारलं असता विनायक राऊत म्हणाले, एकनाथ शिंदेंनी लक्षात ठेवावं, सावरकरांचा जयघोष करण्याचा ठेका फक्त भाजपाने घेतला नाही. बाळासाहेब ठाकरेंनी सावरकरांचे प्रथम स्मारक शिवतीर्थ येथे केले.

पुढे बोलताना विनायक राऊत म्हणाले, दिल्लीत सावरकरांची जयंती केली म्हणून, एकनाथ शिंदे मोठे भक्त झाले, असं नाही. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी आम्ही सुरुवातीपासून करत आहे. हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींना भेटून सावरकरांना भारतरत्न जाहीर करण्यास सांगावं, असं आव्हानही राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिले.

संसद भवनाच्या कार्यक्रमात काहींनी मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहे. याबद्दल विचारल्यावर विनायक राऊतांनी सांगितलं, एकनाथ शिंदेंचा बुद्धीभ्रंश झाला आहे. विरोधकांचा बहिष्कार नवीन संसद भवनाला नाही. देशाच्या सर्वोच्च सभागृहाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं असतं, तर काय नुकसान झालं असतं. दुर्दैवाने नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना निमंत्रण सुद्धा नाही.

Check Also

संध्या सव्वालाखे यांचा आरोप, महिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून गैरवापर

महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *