होळी सणाच्या पुजेसाठी फुलं आणण्यासाठी दुचाकीवर गेलेल्या तीघांचा चुकीच्या मार्गावरून जाणाऱ्या शिवनेरी बसने धडक दिल्याने झालेल्या या अपघातात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पीआर टीम मधील एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यात आणखी दोघेजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त पुढे आले आहे. ही घटना रात्री उशीरा प्रभादेवी येथे घडली.
बुधवारी मध्यरात्री होळीच्या सणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पीआयआर टीममधील प्रणय बोडके (वय २९) आणि करण शिंदे (२९), दुर्वेश गोरडे हे तिघेजण दुचाकीवरून दादरच्या फुल बाजारातून होळीसाठी फुले आणण्यासाठी जात होते. त्याचवेळी प्रभादेवीच्या पुलावरून शिवनेरी एसटी बस चुकीच्या दिशेने भरधाव वेगात आली. या बसने प्रणय बोडके याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यानंतर या तिघांना स्थानिकांनी केईएम रूग्णालयात नेलं प्रणयचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर दुर्वेश आणि करण हे दोघेजण गंभीररित्या जखमी असून त्या दोघांवर ग्लोबल रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
त्याचबरोबर शिवनेरी एसटी बस चालक इक्बाल शेख या स्थांनिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं. या अपघातात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पीआर टीममधील प्रणय बोडके याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात त्याची पत्नी, आई-वडील, दिड वर्षाचा मुलगा असे आहेत. त्यांच्या घरातील प्रणय बोडके हा एकमेव कमावता व्यक्ती होता. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाचा मोठा आधारवड गेला असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.