मुंबईः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि कालावधीची मुदत पूर्ण झालेल्या शासकिय सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठीचा कालावधी ३१ जुलै ऐवजी ९ ऑगस्ट २०२१ पर्यत वाढविण्यात आला आहे. तर मंत्री, आमदाराच्या शिफारसीनुसार बदल्यांसाठी २० दिवसांचा कालावधी वाढत कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ करण्यात आली असून राज्य सरकारने यासंबधीचा सुधारीत आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे.
यापूर्वी राज्य सरकारने शासकिय नोकरीतील अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्यांसाठी ३१ जुलै पर्यंतची मुदत निश्चित केली होती. तर मंत्री, आमदारांच्या शिफारस-विनंतीनुसार बदल्या करण्यास १४ ऑगस्ट २०२१ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. तसेच फक्त १५ टक्के कर्मचाऱ्यांच्याच बदल्या करण्याची परवानगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. परंतु तो शासन निर्णय आता रद्द करण्यात आला आहे.
यासंदर्भात नव्याने जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार नियमित बदल्यांसाठी ९ ऑगस्ट २०२१ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर मंत्री, आमदारांच्या शिफारस-विनंतीनुसार बदल्या करण्यासाठी ३० ऑगस्ट २०२१ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना परवानगी देण्यात आली होती. त्यात आता आणखी १० टक्के कर्मचाऱ्यांची वाढ करत २५ टक्के कर्मचाऱ्यांची आता बदली करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
शासनाच्या सुधारीत आदेशामुळे सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला असून आता मर्जीतील ठिकाणी बदल्यांसाठी प्रयत्न करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
