Breaking News

राणे भावांच्या विरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात FIR तर नौपाडा येथे तक्रार अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसने दिली एफआयआर

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दाऊदचा हस्तक आणि पाकिस्तानचा एजंट असे संबोधन वापरल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे यांच्या विरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने गुन्हा दाखल करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली लेखी फिर्याद दिली आहे. नौपाडा पोलिसांनी या प्रकरणात योग्य तो गुन्हे दाखल करण्यासंदर्भात शहराध्यक्ष आनंद परांजपे यांना आश्वासित केले.

दरम्यान, नितेश राणे यांनी आपली उंची तपासावी असा उपरोधिक टोला लगावत ते वक्तव्य म्हणजे सुर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. निलेश राणे हे पूर्वी रात्रीचे ‘औषध’ घेत होते. आता त्यांनी दिवसाही औषध घ्यायला सुरूवात केली असावी. त्यामुळेच ते काहीबाही बरळत आहेत, असा टोला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला.

माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीट करून शरद पवार हे दाउदचे हस्तक असल्याचे म्हटले होते, तर नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन निलेश राणे यांच्या ट्वीटची री ओढत शरद पवार यांना दाऊदचा हस्तक तसेच पाकिस्तानी एजंट असे संबोधन केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच अनुषंगाने आज राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस स्टेशन गाठले. हरी निवास सर्कल ते पोलीस ठाणे असे चालत जावून हा गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी फिर्याद देऊन भादंवि १२० ब, १५३, १५३ (अ) , ४९९, ५००, ५०५ (१) क अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लेखी फिर्यादीद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसने केली. तर याच कलमाखाली आझाद मैदान पोलिस ठाण्यात आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राणे बंधू हे वारंवार आमचे श्रद्धेय शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका करीत असतात. ही टीका आणि आरोप करण्यापूर्वी निलेश आणि नितेश या राणे बंधुंनी आपली उंची तपासावी, त्यानंतरच सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करावा. पवार साहेब हे निलेश आणि नितेश राणे यांच्या वयापेक्षा अधिक सामाजिक जीवनात सक्रीय आहेत. याची जाणही या राणे बंधूंना नाही. राणे बंधूंची आजवरची कारकिर्द पाहता त्यांनी आपली वैचारिक कुवत ओळखून भाष्य करावे; अन्यथा, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असा इशारा परांजपे यांनी दिला.

Check Also

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिली समीर वानखेडे यांना क्लिन चीट: वाचा निकाल मुस्लिम धर्मांतर केल्याचे दिसून येत नाही

आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्र आणि …

Leave a Reply

Your email address will not be published.