Breaking News

राष्ट्रीय स्टार्टअप दिवस २०२५: महाराष्ट्रात स्टार्टअप्स सक्षमीकरणासाठी कार्यक्रमाचे आयोजन जास्तीत जास्त स्टार्टअप्सना सहभागी होण्याचे कॅबिनेट मंत्री लोढा यांनी केले आवाहन

स्टार्टअप्स हे केवळ स्थानिक आणि जागतिक पातळीवरची आव्हानेच सोडवत नाहीत, तर यातून रोजगार निर्मिती, राज्याच्या अर्थव्यवस्थेला वृद्धिंगत करण्यासाठी हातभार लावते. २०४७ सालापर्यंत भारताला जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्था बनवण्याच्या महत्त्वाकांक्षेसह, भारताचे दूरदृष्टी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिन घोषित केला आहे. या विशेष दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीद्वारे येत्या १६ जानेवारी रोजी मुंबईत एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शहराचे व्यावसायिक आणि कॉर्पोरेट हब बनलेल्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये १६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या “Empowering Innovation, Elevating Maharashtra” या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्रासह देशभरातील स्टार्टअप उद्योजक सहभागी होतील. तंत्रज्ञान, कृषी, सेवा क्षेत्र, औषध निर्माण तसेच पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील उद्योगांतर्फे आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण येथे होणार आहे.

दिवसभरात होणाऱ्या पॅनेल चर्चांमध्ये गुंतवणुकदारांच्या गरजा आणि युवा उद्योजकांच्या यशाच्या कथा यावर विशेष सत्रे आयोजित केली जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्टार्टअप कंपन्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. प्राथमिक टप्प्यातच अपेक्षेच्या ५०% पेक्षा जास्त अर्जदार पहिल्या तीन दिवसांतच नोंदणीकृत झाले आहेत. प्राप्त अर्जांपैकी पात्रतेनुसार निवड करून ज्या कंपन्यांची निवड केली जाईल, त्यांना कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात येईल.

हा कार्यक्रम उद्योजक, युवा, कदार, इन्क्युबेटर्स यांना एकत्र आणून राज्यातील स्टार्टअप इकोसिस्टम मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. स्टार्टअप क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, पॅनेल चर्चा तसेच स्टार्टअपना राज्यस्तरावर आपले विचार सादर करण्याची संधी यामध्ये दिली जाईल. उद्योगक्षेत्राचा विस्तार करण्यासाठी गुंतवणूक, सहकार्य आणि भागीदारी याविषयी सखोल चर्चा आणि मार्गदर्शन केले जाईल. याप्रसंगी काही निवडक स्टार्टअप विजेत्यांचा सत्कारही केला जाणार आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सनी www.msins.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, सहभागासाठी अर्ज करण्याची मुदत १२ जानेवारी २०२५ पर्यंत आहे असे मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक औद्योगिकता असलेले राज्य आहे तसेच सर्वार्थाने देशास आवश्यक असणाऱ्या नाविन्यपूर्ण प्रयोगांची सातत्यपूर्ण चाचणी करत देशाला दिशा देणारे अग्रणी राज्य आहे. औद्योगिकतेला नाविन्यतेची साथ देऊन, महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी, नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी अंतर्गत इनक्यूबेटर्सची स्थापना, ग्रँड चॅलेंज, हॅकॅथॉन, गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणन अर्थसहाय्य योजना, बौद्धिक संपदा हक्क अर्थसहाय्य योजना, महाराष्ट्र व्हर्चुअल इनक्युबेशन सेंटर यांसारख्या अनेक कार्यक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *