बेकायदा निवारागृहात ठेवलेल्या आपल्या हिंदू जोडीदाराची तत्काळ सुटका करण्याचे आदेश द्या, अशी मागणी एका मुस्लिम तरूणाने उच्च न्यायालयात याचिकेतून केली आहे. आपल्याला धमक्या येत असून आमच्या दोघाच्या सुरक्षेसाठी पुरेसे पोलीस संरक्षण देण्याची मागणीही या तरूणाने याचिकेमार्फत केली आहे.
मुलीच्या पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आपल्या जोडीदाराला चेंबूर येथील शासकीय महिला वसतिगृहात बेकायदेशीररीत्या ठेवले आहे. अशा पद्धतीने तिला तेथे ठेवणे हे तिच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असून न्यायालयाने अशा प्रकारांना मज्जाव केल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.
जोडीदाराने पालकांचे घर स्वेच्छेने सोडले होते आणि आपल्यासह सहमतीने लिव्ह-इनमध्ये राहत होती. अशा नातेसंबंधांत आपल्यासह राहण्याचा निर्णय तिने जाणीवपूर्वक, कोणत्याही दबावाविना घेतल्याचा दावाही याचिकाकर्त्याने केला आहे. याचिकाकर्त्याने याचिकेसह नोटरीकृत प्रतिज्ञापत्रही जोडले असून त्यात तरूणीने ती याचिकाकर्त्यासह पती-पत्नी म्हणून अनेक महिन्यांपासून स्वतःच्या इच्छेने राहत असल्याचे म्हटले आहे. तरूणीने कोणताही गुन्हा केलेला नाही किंवा ती कोणताही गुन्ह्यात सहभागी नाही. आम्ही दोघे परस्परसहमतीने लिव्ह-इनमध्ये असल्याचे सांगूनही पोलिसांनी तिच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. तसेच, तिला निवारागृहात बेकायदेशीररीत्या ठेवण्याची पोलिसांची कृती मनमानी असल्याचे याचिकेत म्हटले आहे. तरूणी तिने याचिकाकर्त्याशी कोणत्याही दबावाविना लग्न करण्याचा आणि इस्लाम धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे सांगताना दिसत आहे.