Breaking News

मुंबई आयुक्तांनी लॉकडाऊन आणि अतिरिक्त निर्बंधांवर केले “हे” महत्वपूर्ण भाष्य महापौर पेडणेकरांच्या वक्तव्यावर आयुक्तांचा खुलासा

मराठी ई-बातम्या टीम

काही दिवसांपूर्वी मुंबईत २० हजाराचा टप्पा कोरोना रूग्णसंख्येने पार केल्यासा लॉकडाऊन लागू करावा लागेल असे मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर केल्यानंतर नेमके काल मुंबईत जवळपास २० हजार रूग्णांची नोंद झाल्यानंतर महापौर आणि मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल काय भूमिका घेणार याकडे भूमिका लागलेली असतानाच आज आयुक्त चहल यांनी सध्या लॉकडाऊन आणि अतिरिक्त निर्बंधाची गरज नसल्याचे सांगत मुंबईत लॉकडाऊनची गरज नसल्याचे एकप्रकारे स्पष्ट केले.

महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी आज काही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले.

काल दिवसभरात मुंबईत जवळपास २० हजार रूग्ण आढळले. त्यापैकी फक्त ११० लोक ऑक्सिजन बेडवर गेले. ११८० लोक रुग्णालयात दाखल झाले. ३५ हजार पैकी फक्त ५९९९ बेड भरले आहेत. ८४ टक्के बेड रिकामे आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचा वापर नगण्य आहे, बेड रिकामे असल्याच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही लॉकडाऊनची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा झाली. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचा विचार करण्याची भूमिका मांडली. पण मी सांगितले की, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचे मापदंड पॉझिटिव्हिटी होते. पण आता मुंबईतले १८६ रुग्णालय, ३५ हजार बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचे निकष बदलून पॉझिटिव्हीटी ऐवजी पहिला निकष म्हणजे रुग्णालयात किती बेड रिकामे आहेत आणि दुसरा निकष म्हणजे ऑक्सिजनचा वापर किती होतोय असे करावेत अशी सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.

आता रुग्णांच्या आकड्याला महत्त्व राहिलेलं नाही. हॉस्पिटलची, ऑक्सिजनच्या वापराची, ऑक्सिजन बेडची स्थिती काय आहे, हे महत्त्वाचं आहे. रुग्णसंख्या कमी असतानाही ऑक्सिजनचा किंवा आयसीयूचा वापर वाढला, तर आपण निर्बंधांचा विचार करू. रुग्णसंख्या कमी-जास्त होत असेल, तर त्याचा फरक पडत नाही. काल ६४ हजार चाचण्या केल्या होत्या, आज ७२ हजार चाचण्या केल्या आहेत. पण आता आकड्यांवर लॉकडाऊन होऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

२१ डिसेंबर २०२१ पासून आपल्याकडे पॉझिटिव्हिटी रेट वाढायला सुरूवात झाली. १६ दिवसांत मृत्यूचा आकडा १९ आहे. म्हणजे सरासरी दिवसाला एक मृत्यू आहे. आपल्याकडे रुग्णांची संख्या १ लाखाच्या वर गेली आहे, पण मृत्यू सरासरी एकच आहे. त्यामुळे या आकडेवारीनुसार अतिरिक्त निर्बंधांची गरज नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबई लोकलमधून ६० लाख लोक प्रवास करत आहेत. सगळे दुहेरी लस घेतलेले आहेत. त्यामुळे तिथे निर्बंध घालण्याची गरज नाही. पुढे जे काही होईल, त्यावर आमचे बारीक लक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

सनदी अधिकारी रूबल अग्रवाल यांना “बोंगिरवार उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार” बोंगिरवार फाउंडेशनच्यावतीने अंकिल गोयल यांचाही पुरस्काराने सन्मान

मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या पुणे शहरात आरोग्य व्यवस्था मजबूत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *