Breaking News

अमित ठाकरेंचा टोला “सत्ताधाऱ्यांकडे इच्छाशक्ती नाही, आपणच समुद किनारे स्वच्छ ठेवूया” मुंबईसह कोकणातील समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेवरून आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा

मराठी ई-बातम्या टीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्या ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहिमे’ला आज सगळीकडे भरभरून प्रतिसाद लाभला. मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील ४० समुद्र किनाऱ्यांवर हजारो नागरिकांनी सक्रिय सहभाग घेत ‘आपले’ समुद्र किनारे प्लॅस्टिकमुक्त तसेच कचरामुक्त केले. हा एक आगळावेगळा विक्रमच असल्याचंही म्हटलं जातंय.

“परदेशातील समुद्र किनारे स्वच्छ, चकाचक असू शकतात, मग आपले समुद्रकिनारे गलिच्छ, बकाल का असतात?” असा सवाल उपस्थित करून मनसे नेते अमित ठाकरे यांनी ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहिमे’त सहभागी होण्याचं आवाहन सर्वाना केले होते.

आज- शनिवारी सकाळी ११ वाजता ते स्वतः दादर समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. ‘सावित्री प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा शर्मिला राज ठाकरे यांनीही समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. विशेष म्हणजे, दादर समुद्र किनाऱ्यावर चार हजाराहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. त्यांमध्ये अपंग बांधवांचाही समावेश होता.

“गेली २५ वर्षं जे सत्तेत आहेत, ते साधे समुद्र किनारे स्वच्छ करू शकले नाहीत. दुर्दैवाने, असं काही करण्याची इच्छशक्तीच त्यांच्याकडे नाही. म्हणूनच माझं आता लोकांनाच आवाहन आहे की, आपले समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपणच आपल्या हातात घेऊया” असा उपरोधिक टोला अमित ठाकरे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लगावला.

मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार, मनसे पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेच्या माध्यमातून राबवण्यात येणारी ही मोहीम म्हणजे फक्त एका दिवसाचा उपक्रम नाही. आपल्या राज्यातील सर्व समुद्र किनारे स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित बनवण्यासाठी आम्ही लोकसहभागातून पुढची अनेक वर्षं काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या ४० समुद्र किना-यांवर आम्ही स्वच्छता मोहीम राबवत आहोत, तिथे स्थानिक नागरिकांशी संवाद साधून ‘समुद्र किनारा समिती’ स्थापन करण्यात आली आहे. आज आम्ही स्थापन केलेल्या ४० ‘समुद्र किनारा समित्या’ असून प्रत्येक समितीत २५ सदस्य आहेत. या समित्याच यापुढे समुद्र किना-यांशी संबंधित आपले वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी दिली.

स्वच्छता मोहीम राबविण्यात आलेल्या समुद्र किनाऱ्यांची नावं:-

गिरगाव, प्रभादेवी-दादर, माहिम, वांद्रे, वर्सोवा, जुहू, आक्सा, दानापानी, उत्तन, वेलंकनी, डहाणू, नांदगाव, केळवा, अर्नाळा, कळंब, नायगाव- सुरुची, चिंचणी, शिरगाव, नागाव, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, मुरुड, किहिम, अलिबाग, उरण, आवास, सासवणे, मुरुड- हर्णे, आंजर्ले, गणपतीपुळे, मांडवी, गुहागर, सागरेश्वर- वेंगुर्ला, शिरोडा, कुणकेश्वर.

Check Also

नितेश राणे यांना अटक होणार का? उत्तर उद्या मिळणार अटकपूर्व जामीनावर उद्या होणार सुणावनी

मराठी ई-बातम्या टीम जिल्हा बँक निवडणूकीतील प्रचाराच्या कारणावरून शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपा आमदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *