६ डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त निमित्ताने मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या बौद्ध धर्मियांविषयी समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत केल्या प्रकरणी ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईतील रबाळे पोलिसांनी केतकी चितळेला अटक केली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. केतकी चितळेच्या विरोधात २०२० मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यासंदर्भात आता रबाळे पोलिसांनी कारवाई केली.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवर टीका करणारी पोस्ट केतकी चिकळे हीने समाजमाध्यमावर प्रसारीत केली. त्यामुळे तिच्या विरोधात कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ठाणे पोलिसांनी तिला ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने सुरुवातीला चितळे हीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तीन दिवसांची पोलिस कोठडीत काढल्यानंतर तिला न्यायालयाने पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. नेमक्या त्याच कालावधीत चितळे हिच्या विरोधात गोरेगांव पोलिस ठाण्यात, पिंपरी-चिंचवड पोलिस ठाण्यात आणि देहू रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे या पोलिसांनी चौकशीसाठी ताबा मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला. मात्र न्यायालयाने सुरुवातीला गोरेगांव पोलिसांच्या हवाली चितळेला केले. त्यानंतर आता तिच्या विरोधात २०२० मध्ये अॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता तिच्यावरील कारवाईला सुरुवात झाली आहे.
केतकी विरोधात यापूर्वी रबाळे पोलीस ठाण्यात बौद्ध धर्माविषयी समाज माध्यमावर आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल होता. त्यामुळे रबाळे पोलिसांनी आता तिचा ताबा घेतला आहे.आज शुक्रवारी तिला न्यायालयात हजर केले. हा गुन्हा दोन वर्षांपूर्वी झाला होता. तसेच केतकीचा जबाब रबाळे पोलिसांनी यापूर्वीच घेतला होता. त्यामुळे तिला पोलिस कोठडीची आवश्यता नसल्याचे केतकीच्या वकिलांनी न्यायालयात म्हटले. तर या प्रकरणाचा तपास करणे आवश्यक असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी केतकी चितळेला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
