Breaking News

प्रदीर्घ काळ तुरुंगवास भोगणाऱ्याला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर अंदाजे एक हजार कोटी रुपयांच्या १९१.५० किलो हेरॉईन बाळगण्याचा आऱोप

अपुरा पुरावा आणि खटल्याच्या प्रगतीविना प्रदीर्घ काळ तुरुंगवास भोगावा लागल्याचे निरीक्षण नोंदवून क्लियरिंग एजंट व मेसर्स एम. बी. शिपिंग आणि लॉजिस्टिक सर्व्हिसेसमध्ये भागीदार असलेल्या कोंडीबा गुंजाळ यांना उच्च न्यायालयाने अंदाजे एक हजार कोटी रुपयांच्या १९१.५० किलो हेरॉईन जप्तीच्या प्रकरणात जामीन मंजूर केला.

गुंजाळ यांचा या अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असलेला कोणताही सबळ पुरावा नाही. एनडीपीएस कायद्यातील कलम ६७ अंतर्गत दिलेल्या विधानाचा उपयोग एनडीपीएस कायद्याच्या तरतुदींखालील गुन्ह्याच्या खटल्यात कबुली जबाब म्हणून केला जाऊ शकत नाही, या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखला देताना न्या. भरत देशपांडे यांच्या एखलपीठाने गुंजाळ यांना जामीन मंजूर करताना नमूद केले. तसेच गुंजाळच्या व्यावसायिक कामांसाठी स्वाभाविकपणे सहआरोपींच्या संपर्कात होते त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे आणि मालासंबंधित कागदपत्रे हाताळणे आवश्यक होते. शिवाय, क्लियरिंग एजंट म्हणून अर्जदाराला मिळणारी रक्कम नाममात्र असून त्यात बेकायदेशीर व्यवहार आढळून येत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. अर्जदार आणि अन्य आरोपी हे एका फर्ममध्ये भागीदार असल्यामुळे एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांच्यातील वैयक्तिक फोनवरील संभाषण, व्यावसायिक व्यवहार हे नैसर्गिक आहे. दुसरीकडे, गुंजाळ हे तीन वर्षांपासून कारागृहात आहेत. खटल्यात कोणतिही प्रगती नाही, ५४ साक्षीदारांची यादी फिर्यादीपक्षाने दिली आहे. त्यामुळे खटला जलदगतीने पूर्ण होईल, असे दिसून येत नसल्याचेही अधोरेखित करून न्यायालयाने गुंजाळ यांना एक लाखाच्या वैयक्तिक मुचलक्यावर जामीन मंजूर केला.

काय आहे नेमकं प्रकरण

मेसर्स एनम.बी शिपिंग आणि लॉजिस्टिक सर्व्हिसेस,नामक कंपनीत गुंजाळ हे भागीदार आणि क्लियरिंग एजंट होते. त्यातच ९ ऑगस्ट २०२१ रोजी अंमली पदार्थ लपवून ठेवलेल्या मालाला अंदाजे एक हजार कोटी रुपयांच्या १९१.५० किलो हेरॉईन क्लिअरन्स करून देणाच्या कथित सहभागासाठी गुंजाळ यांना अमली पदार्थ नियंत्रण विभागाने( एनसीबी) अटक केली होती. परंतु, अर्जदाराला प्रतिबंधित अंमली पदार्थाच्यासंदर्भात कोणतिही माहिती नव्हती आणि ते केवळ क्लिअरिंग एजंट म्हणून कर्तव्य बजावत असल्याचा युक्तिवाद गुंजाळ यांच्यावतीने अँड. सुजय कांतावाला यांनी केला. गुंजाळ यांचे कॉल रेकॉर्ड आणि व्हॉट्सॲप चॅट्सवरून त्यांच्या अंमलीपदार्थाच्या मालाच्या क्लिअरन्समध्ये सहभाग आढळून येतो. गुंजाळ आणि त्याचा चुलत भाऊ आणि व्यावसायिक भागीदार मीनानाथ बोडके यांच्यासह इतर आरोपींच्या नियमित संपर्कात असल्याचा दावाही फिर्यादी पक्षाकडून कऱण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *