Breaking News

ईडीची प्रताप सरनाईकांवर पुन्हा कारवाई: आतापर्यंत ३२५४ कोटींची मालमत्ता जप्त आज ११.३५ कोटींची संपत्ती जप्त

मागील काही महिन्यात मनी लॉड्रींग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर सातत्याने धाडी टाकत त्यांची हजारो कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. तसेच याप्रकरणी ईडीकडून प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग यांची चौकशीही केली होती. त्यानंतर आज पुन्हा ईडीने कारवाई करत सरनाईक यांच्या ११.३५ कोटी रूपयांच्या दोन सदनिका जप्त करण्याची कारवाई केली. आतापर्यंत सरनाईक यांची ३ हजार २५४ कोटी रूपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आल्याची माहिती स्वतः ईडीनेच दिली.

ईडीने केलेली ही कारवाई एनएसईएल घोटाळा अंतर्गत केलेली असून त्यांच्यावर पीएमएलए कायद्याखाली प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करण्यात आली. ठाण्यातील जमीन आणि दोन फ्लॅट जप्त केले आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत ईडीने प्रताप सरनाईकांची ११.३५ कोटींची संपत्ती जप्त केली.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एनएसईएल प्रकरणात त्यांचे संचालक, प्रमुख अधिकारी, २५ डिफॉल्टर आणि इतरांवर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला आहे. आरोपींनी गुंतवणुकदारांची फसवणूक करण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. गुंतवणूकदारांना नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडच्या (NSEL) च्या प्लॅटफॉर्मवर व्यापार करण्यास प्रवृत्त केले, बनावट कागदपत्रे तयार केली, खोटी खाती तयार केली आणि त्याद्वारे फसवणूक केल्याचा आरोप आहे. १३ हजार गुंतवणूकदारांची ५६०० कोटींची फसवणूक केल्याची माहिती ईडीने दिली.

पीएमएलए अंतर्गत करण्यात आलेल्या तपासात आढळून आले आहे की, वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे एनएसईएल च्या कर्जदार/ट्रेडिंग सदस्यांनी रिअल इस्टेटमधील गुंतवणूक, थकित कर्जाची परतफेड आणि इतर गोष्टींसाठी वळवले होते.

ईडीने केलेल्या तपासानुसार, आस्था ग्रुपकडे एनएसईएलची २४२.६६ कोटींची थकबाकी होती. आस्था ग्रुपने सन २०१२-१३ कालावधीत विहंग आस्था हाऊसिंग प्रोजेक्टकडे २१.७४ कोटी वळते केले. त्यापैकी ११.३५ कोटी विहंग एंटरप्राइजेस आणि विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडकडे वळते करण्यात आले. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असल्याची माहिती ईडीने दिली.

ईडीने पैशांच्या या साखळीचा तपास केल्यानंतर प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली असून त्यांच्या नावे असणारे दोन फ्लॅट आणि जमिनीचा भाग जप्त केला आहे. याची एकूण किंमत ११.३५ कोटी आहे. ईडीकडून अद्यापही तपास सुरु आहे.

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *