Breaking News

पक्षाचा फलक लावण्यावरून मनसे पदाधिकाऱ्याची महिलेला ढकलून देत मारहाण महिला दोनवेळा पडली तरी मारहाण सुरुच ठेवली

सध्या सगळीकडे गणेशोत्सव उत्साहात सुरु आहे. मात्र मुंबादेवी परिसरात गणपती मंडपाच्या लागून पक्षाचा फलक लावण्यावरून एका महिलेने मनसे पदाधिकाऱ्याला हरकत घेतली. मात्र या पदाधिकाऱ्याने महिलेला ढकलून देत मारहाण केल्याचा एक व्हिडिओ प्रसारीत झाला आहे. या व्हिडिओमध्ये मारहाण करताना सदरची महिला दोन वेळा पडली तरी मनसे पदाधिकाऱ्याने मारहाण करतच राहिल्याचे दिसून येते. त्यामुळे मनसेचे उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिळे हे अडचणी आले. मात्र झला प्रकार चुकीचाच झाला परंतु त्या महिलेच्या वर्तनामुळे आणि घाणेरड्या शिव्या दिल्याने ही घटना घडल्याचे मनसेकडून सांगण्यात येत आहे.

मुंबादेवी परिसरात गणपतीसाठी मनसेचा फलक लावण्यात येत होता. त्या ठिकाणी प्रकाश देवी यांचे औषधाचे दुकान आहे. त्यासमोर खांब उभारण्यात आला होता. मनसे पदाधिकारी विनोद अरगिळे हे सहकाऱ्यांसह तेथे हजर होते. त्यावेळी प्रकाश देवी यांनी त्यास विरोध केला. ताबडतोब हे सगळे काढून टाका असे त्यांनी सांगितले. त्यावरून विनोद अरगिळे व प्रकाश देवी यांच्यात वाद झाला आणि त्यातून विनोद अरगिळे यांनी त्या महिलेस ढकलून दिले व मारहाण केल्याचे त्या चित्रफितीत दिसत आहे.

या हाणामारीत ती महिला दोन वेळा खाली पडली. यामुळे गणेशोत्सवाच्या वातावरणाला गालबोट लागले. ही मनसे कार्यकर्त्यांची दादागिरी असल्याची टीका काही जणांनी समाज माध्यमांवर केली. तर मनसेचे मुंबादेवी विभाग अध्यक्ष केशव मुळे यांनी मात्र या घटनेला दुसरी बाजू असल्याचेही म्हटले आहे.

विनोद अरगिळे यांनी महिलेला धक्काबुक्की करत असल्याची चित्रफीत दाखवली जात आहे. पण या घटनेची पार्श्वभूमी वेगळी आहे. ती महिला पैसे घेऊन फेरीवाल्यांना बसवते. त्यात अडथळा नको म्हणून फलकाचा खांब ती ढकलत होती. तिने मनसेच्या कार्यकर्त्यांना घाणेरड्या भाषेत शिवीगाळही केली. त्यातून हा प्रकार घडला, असे मुळे यांनी स्पष्ट केले.

विनोद अरगिले म्हणाले, ती बाई कोट्यधीश असून रोडवर हप्ता खाते. ती रोज रोडवर धंदे लावते. तिला विभागातील सर्वच नागरिक त्रासले आहेत. आम्ही गणेशभक्तांच्या स्वागतासाठी गेट लावत होतो तेव्हा या बाईने २० फुटांचा वासा ढकलून दिला. तो लाकडी वासा पडला असता तर अनेकजण जखमी झाले असते. हे राज ठाकरेच्या घरी लावा असं ही बाई म्हणाली. तसेच माझ्या अंगावर आली.

मी एवढ्या वर्षांपासून येथे काम करतो. या व्हिडीओत केवळ एक बाजू दाखवली आहे. ती बाई आमच्या अंगावर येते. हवंतर आजूबाजूच्या दुकानदारांना विचारा. त्या बाईने येऊन थेट तो गेटचा वासा ढकलला. तसेच आम्हाला शिवीगाळ केली. याबाबत आम्ही पोलिसांना फोन करून माहिती दिली आहे. त्याचं आमच्याकडे रेकॉर्डिंग देखील आहे. याआधीही आम्ही या बाईविरोधात तक्रार केली असल्याचे विनोद अरगिले यांनी सांगितले.

या महिलेने थेट माझी कॉलर पकडली, मग आम्ही बचावासाठी काहीच करायचं नाही का? महिलांचा आदर, सन्मान केला पाहिजे हे ठिकच आहे. त्याबद्दल कोणतीही शंका नाही. मात्र, महिलांनीही पुरुषांचा आदर, सन्मान राखला पाहिजे. आम्ही हातगाड्यांविरोधात आहोत म्हणून हे षडयंत्र रचलं जात आहे. त्याविरोधात आम्ही तक्रार दाखल केली आहे. न्यायालयातही खटला दाखल असल्याचे ते म्हणाले.

Check Also

आता काँग्रेसचे राज्य सरकारच्या विरोधात ‘चिपकू’ आंदोलन आरे मेट्रो कारशेडच्या विरोधात आंदोलन करणार

मेट्रो-३ च्या मार्गिकेसाठी उभारण्यात येणाऱ्या मेट्रो कारशेडचा तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी …

Leave a Reply

Your email address will not be published.