Breaking News

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मुंबई म्हणजे सोन्याचं अंड देणारी पण… महापालिकेच्या वातावरणीय कृती आराखडा अहवाल प्रकाशित

मुंबई महानगरपालिका आणि राज्याच्या पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागाचे अभिनंदन करतो. हा विषय आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे, आपलं जगणं सुसह्य करण्यासाठी ज्या सुविधा उभारतो त्या उभारतांना त्या पर्यावरणस्नेही आहेत का याचा विचार करणे अगत्याचे झाले आहे. निरोगी जगण्यासाठी चांगलं वातावरण आवश्यक आहे. पण मुंबईला सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणतात पण येथल्या सुविधांवर ताण येतोय असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत आरेचं जंगल वाचवून मी काही उपकार केले नाहीत तर माझं कर्तव्य केल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेच्या मुंबई वातावरण कृती आराखडा अहवालाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या कार्यक्रमाला ते दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार अरविंद सावंत, पालिका प्रशासक इक्बालसिंग चहल आणि विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर आदी उपस्थित होते.

अनेकदा यावर चर्चा होते, परिसंवाद होतात, पण आपण काही करत नाही. कुणालाही सांगून खरं वाटणार नाही की आजच्या आणि गेल्या महिन्यात याच दिवसाच्या तापमानात किती मोठा फरक झाला आहे. ही श्रमिकांची मुंबई, घाम गाळणाऱ्यांची मुंबई, त्यांना सुविधा देणे आपलं काम. वातावरणीय बदल म्हणजे नेमकं काय, हे थोपवता येत नाही का,  मग हे कुणी करायचं, कुणीतरी म्हणजे कुणी करायचं. हाच धागा पकडत  मुंबई महापालिकेने पहिले पाऊल टाकले. देशातील हे पहिले महानगर आहे ज्याने पर्यावरणीय बदल व त्याचे दुष्परिणाम थोपवण्यासाठी, पहिलं पाऊलं टाकलं, कृती केल्याबद्दल त्यांनी यावेळी कौतुकही केले.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, सोन्याचं अंड देणारी कोंबडी, पण असं म्हणतो पण या शहराच्या सुविधांवर ताण येत आहे. कधीही न धावणाऱ्या मुंबईला रस्ते, वीज, पाण्याचा प्रश्न भेडसावू शकतो. मुंबईला या सुविधा देण्यासाठी पालिका कसोशीने काम करत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पिंजाळ प्रकल्पाचे काम आपण करत आहोत. सुविधा उभारतांना आपण काय गमावणार याचा विचार करणेही गरजेचे असून समुद्राच्या पाण्याचा यासाठी का नाही उपयोग करायचा, इतरत्र जर समुद्राच्या पाण्याचा वापर होत असेल तर मुंबई ने का नाही याचा विचार करुन यावर आपण काम सुरु केलं आहे, लवकरच आपण मुंबईच्या समुद्राचं पाणी पिण्यालायक करू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

विकास मुळावर येणारा नको, तो शाश्वत हवा, शाश्वत म्हणजे काय तर पर्यावरणाची हानी न करता दीर्घकालीन टिकणारा विकास हवा असे सांगत ते पुढे म्हणाले की, तापमानात होणाऱ्या वाढीत आपण योगदान देणार नाही याची काळजी घेणं महत्वाचं आहे. आरेचं जंगल वाचवून मी उपकार नाही केले कर्तव्य केले. राज्य हिताचे जे जे ते ते मी मुख्यमंत्री म्हणून करणारच असेही त्यांनी सांगितले.

पहिल्या पावसात मातीचा सुगंध दरवळायचा, आता मातीचा सुंगध येतोच कुठे कारण संपूर्ण काँक्रीटीकरण झाले आहे, पाऊस पडतो  पूर्वी पाणी झिरपत होते ते आता लोकांच्या घरात शिरतं, मग याला विकास म्हणायचा का असा सवाल करत ते म्हणाले की, आपल्याला अतिवृष्टीचा इशारा मिळतो पण ढगफुटीचे प्रमाण कुणी सांगू शकत नाही मग कल्पनेपलिकडे पाऊस पडतो. मग याचं कारण शोधतांना वातावरण बदलात मिळतं. पाऊस पडतो, डोंगर खचतात, दरडी कोसळतात माणसं मरतात, मग आपण मदत करतो. ते कर्तव्य ही आहे पण मला वाटतं जीव वाचवण्यासाठी काम करायला हवं, मुंबईतही डोंगर उतारावर वस्त्या आहेत त्यावरही काम करायचं आहे, त्यासाठी हा कृती आराखडा उपयोगी पडेल. महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो त्या महाराष्ट्राची मुंबईही राजधानी आहे. हे आपल्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या वर्षात मुंबईने केलेले काम देशाने स्वीकारलं पाहिजे. त्यातून एक चळवळ निर्माण होईल असेही ते म्हणाले.

इतर राज्य आणि शहरांनी मुंबईप्रमाणे काम करायचं ठरवलं तर मुंबई त्यांना सहकार्य करायला तयार आहे. कारण आपल्याला जशी मुंबई बदलायची आहे तसाच देश बदलायचा आहे. पर्यावरणीय बदल लक्षात घेऊन शाश्वत विकास करणे, पुढच्या पिढीसाठी सुखकर आयुष्य उपलब्ध करून देण्यासाठी देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात काम व्हावं अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

मुख्यमंत्र्यांच्या राजकीय निर्णयाच्या विरोधात मुंबईवर एकटवले मुंबईतील खुल्या जागा, खेळाचे मैदान आणि मनोरंजन मैदानाचे सद्याचे धोरण बदलण्याची हालचाल

मुंबईतील खुल्या जागा, खेळाचे मैदान आणि मनोरंजन मैदानाचे सद्याचे धोरण बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्त यांस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *