Breaking News

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची मुंबईकरांना नवं वर्ष भेट: ५०० चौ.फुटाच्या घरांना कर माफ ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मराठी ई-बातम्या टीम

५०० चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या मुंबईकरांना त्यांचा मालमत्ता कर माफ करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज करत नववर्षाची एक आगवेगळी भेट मुंबईकरांना दिली. तसेच त्यासाठी आवश्यक ती कारवाई लवकरात लवकर पूर्ण करावी असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे सचिव डॉ.महेश पाठक यांच्यासह मंत्रालय प्रशासनाला देत निर्णय तात्काळ अंमलात आणण्याचे आदेशही दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आलेल्या नगरविकास विभागाच्या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिका आयुक्त डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. महेश पाठक यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

५०० चौ.फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला तसेच या निणर्याची तत्काळ अंमलबजावणी करा अशा सुचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. या निर्णयामुळे साधारणत: १६ लाख मुंबईकरांना याचा लाभ होणार आहे.

भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात ५०० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता करात माफी देण्याची घोषणा त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली होती. परंतु त्यावेळी हा निर्णय अंमलात आणता आला नाही. तसेच राज्य सरकार पातळीवरही त्याबाबतच्या हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे हा निर्णय अखेर प्रलंबित राहीला होता.

अखेर शिवसेनेच्या यादीत आश्वासन नाही तर वचन हा शब्द असल्याने जनतेला दिलेले वचन आज आम्ही पूर्ण करत असून ५०० चौरस फुटाच्या घरांमध्ये राहणाऱ्यांना मालमत्ता करात सूट देण्यात येत असल्याचे सांगितले.

१९६६ पासून जन्माला आलेली शिवसेना मुंबईकरांच्या आशीर्वादाने मुंबई सांभाळतेय. आमची ही चौथी पिढी, आजोबा,वडील, मी आणि आता आदित्य. काम म्हणून नाही, कर्तव्य म्हणून नाही तर मुंबईवरचं प्रेम आम्ही पुढे नेत आहोत. शिवसेनाप्रमुख स्वत: जाऊन कामाची पहाणी करत. मी ही नालेसफाई, दहिसर नदीचे काम असेल किंवा सौंदर्यीकरणाचे काम असेल ते जाऊन पहात होतो आता हे काम आदित्य करत आहे. सुविधा द्यायच्याच आहे, नालेसफाई, सौंदर्यीकरण असेल, नदीसफाई असेल, पण हे करतांना मुंबईकरांना दिलासाही द्यायचा आहे. मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही. दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकास कामांमध्ये मोलाचे योगदान देतो. पण त्याला परत काय मिळतं हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे कष्टकऱ्यांच्या घामातून उभ्या राहिलेल्या मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची भाषा करणारे नंतर पाच वर्षे काहीच बोलत नाहीत. शिवसेना हे असे अजिबात करत नाहीत असा उपरोधिक टोला भाजपाला लगावत आता शिवसेनेसोबत आणखी काही मित्र आले. मग राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल बाकीचे ज्यांचे नाव घेतले नाही त्यांच्याबद्दल समजून जा असे सूचक विधान करत  शिवसेनाप्रमुखांनी आखून दिलेली परंपरा शिवसेना जपते आहे. जे काम जमणार असेल तेच वचन द्यायचे, जे जमणार नाही अशी खोटे वचने द्यायची नाहीत, त्यांची हीच परंपरा आपण पुढे नेत आहोत. २०१७ ला जे निवडणूकीत शिवसेनेने जे वचन दिले ते पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, यातील बहूतांश वचने पूर्ण केली. आज एक महत्वाचे वचन या निर्णयाने पूर्ण होत असल्याचे सांगत ५०० चौ. फुटापर्यंतच्या घराच्या मालमत्ताकर माफ करणे हे महत्वाचे वचन आपण आज पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद देत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मुंबईतील ५०० चौ. फुटाच्या घरांवरील मालमत्ता कर माफ करायचा असेल तर चार कायद्यामध्ये दुरूस्ती करावी लागणार आहे. त्यातील पहिला मुंबई महापालिका कायदा, मुंबई प्रेसिडेन्शी अॅक्ट, झाड लावण्यासंदर्भातील कायदा आणि रोजगार हमी आणि शिक्षण उपकर कायद्यात बदल करावा लागणार असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यावर प्रशासनाने या गोष्टींवर तात्काळ अंमलबजावणी करावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.

Check Also

सीबीएसईने पुन्हा एकदा ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम बदलला शैक्षणिक संचालक जोसेफ इम्युन्युअल यांची माहिती

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० शी संरेखित करण्यासाठी २०२४-२५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *