Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा फायदा ४५ वर्षावरील नागरीकांनाच : ४० लाख प्रवाशी वंचित पहिला डोस घेणाऱ्यांच्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी

मुंबई : विशेष प्रतिनिधी

१५ ऑगस्टपासून मुबंईकरांसाठी लोकल प्रवास करण्यास परवानगी देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली असली तरी त्यासाठी दोन डोस घेणाऱ्यांच पहिल्या टप्प्यात परवानगी देण्यात आली आहे. मात्र पहिला डोस घेणाऱ्यांच्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी असल्याने या सवलतीचा सर्वाधिक फायदा तरूणांपेक्षा प्रौढ नागरीकांनाच होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

१ मार्चपासून देशातील लसीकरणाच्या टप्प्यात ४५ वर्षावरील नागरीकांचे लसीकरण सुरु झाले. त्यानंतर १ मे पासून १८ वर्षावरील नागरीकांसाठी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. परंतु लस पुरवठ्यामध्ये जवळपास एक महिना खंड पडला. प्रत्यक्षात १८ वर्षावरील नागरीकांचे लसीकरण जूनच्या मध्यापासून सुरु झाले. त्यामुळे  १८ वर्षावरील नागरीक या निर्णयाच्या फायद्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. अनेकांना दुसरी लस वेळेत उपलब्ध झाली नाही. तर ज्यांनी सुरूवातीला कोव्हॅक्सीन लस घेतली त्यांना नाईलाजाने दुसरा डोस कोविशिल्डचा घ्यावा लागला किंवा दिल्या गेल्याच्या घटना उघडकीस आल्या. तसेच बोगस लसीकरण मोहिमेच्या घटनाही उघडकीस आल्या. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसींचा साठा उपलब्ध होण्यास वेळ लागत असल्याने मुंबईसह महाराष्ट्रात कोविशिल्ड लसींचा साठा उपलब्ध होवू लागला. या लसींची मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. कोव्हॅक्सीनचा पहिली मात्रा घेतल्यानंतर २८ दिवसांनी लगेच २ री मात्रा घेता येते. तर कोविशिल्डच्या पहिल्या मात्रेनंतर जवळपास सुधारीत नियमानुसार ८४ दिवसांनी दुसरी मात्रा घेता येते. त्यामुळे कोव्हॅक्सीन घेतलेल्या मुंबईकरांनाच लोकल प्रवास करता येणार आहे.

सद्यस्थितीत मुंबईतील हेल्थवर्करने पहिला डोस घेतलेल्यांची संख्या २० लाख ५ हजार ६९६ आहे. तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या १५ लाख ९ हजार १५० इतकी आहे. म्हणजे पहिला डोस घेतलेल्यांपैकी दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ५ लाखाने कमी आहे. त्याचबरोबर फ्रंटलाईन वर्करने पहिला डोस घेतलेल्यांची संख्या २४ लाख ७ हजार १५१ तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या १९ लाख २ हजार ५१६ इतकी आहे. म्हणजे या फ्रंटलाईन वर्करमध्येही जवळपास ५ लाख जणांनी दुसरा डोस घेतला नाही किंवा त्यांना मिळालेला नाही. १८ वर्षावरील नागरिकांनी पहिला डोस घेतलेल्यांची संख्या २८ लाख ९३ हजार ४२८ इतकी आहे तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या १ लाख ५३ हजार ६४८ इतकी आहे. तर ४५ वर्षावरील नागरीकांनी पहिला डोस घेतलल्यांची संख्या २५ लाख ११ हजार ६७९ तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १४ लाख ५५ हजार १८१ इतकी असून मुंबईत लस घेणाऱ्यांची संख्या ७८ लाख १८ हजार ४४९ वर पोहोचली आहे.

तर ठाणे जिल्ह्यात हेल्थ वर्करांनी पहिला डोस घेतलेल्यांची संख्या १ लाख १७ हजार ८५१ तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ८३ हजार ३३१ इतकी आहे. पहिला डोस घेणाऱ्या फ्रंटलाईन वर्करची संख्या १ लाख ३५ हजार ५१७ इतकी असून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ८४ हजार १४९ इतकी आहे. तर १८ वर्षावरील व्यक्तींची पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ११ लाख ७२ हजार २२८ इतकी असून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ७६ हजार ६६७ इतकी आहे. तसेच ४५ वर्षावरील व्यक्तींनी पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १३ लाख ३३ हजार २८४ जण असून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ७ लाख ३८ हजार ३५१ इतकी असून एकूण लस झालेल्यांची संख्या ३७ लाख ४१ हजार ३७८ ठाण्यातील आहे.

ठाणे जिल्ह्यात दोन्ही लसींच्या मात्रा घेतलेल्यांची संख्या ९ लाख ८२ हजार ४६८ इतकी असून एकट्या मुंबईत १९ लाख ६० हजार ४९५ इतक्या जणांनी लसीची दुसरी मात्रा घेतली आहे. या दोन्ही संख्येचा विचार केला तर जवळपास २९ लाख नागरीकांना लोकलने प्रवास करण्यास मंजूरी दिल्याचे दिसून येत आहे. कोविडपूर्वी जवळपास ६० ते ७० लाख नागरीक दररोज लोकलने प्रवास करत होते. मात्र आता दोन लसीच्या मात्रेमुळे फक्त २९ लाख अर्थात निम्मे लोकच प्रवास करू शकणार आहेत. अद्यापही ३० ते ४५ लाख प्रवाशी लसीपासून लांब असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

त्यामुळे एकाबाजूला राज्य सरकारने दोन लसींच्या मात्रा घेतलेल्यांसाठी लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली सर्वसामान्य मुंबई आणि उपनगरवासियांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला असला तरी प्रत्यक्षात फक्त अनेकांना प्रवास नाकारण्याच्याच प्रकार केल्याचे दिसून येत असून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे ज्यांनी कोव्हॅक्सीन घेतली त्यांचे ठिक मात्र ज्यांना पहिला डोस कोविशिल्डचा मिळाला त्यांना मात्र जवळपास अडीच महिने थांबावे लागणार असल्याने आम्ही काय घोडे मारले? असा सवाल सर्वसामान्य नागरीकांकडून राज्य सरकारला विचारला जात आहे.

खालील तक्ता पहा कोणत्या जिल्ह्यात कितीजणांनी दोन डोस घेतले:-

Check Also

मंत्रालय मधील कर्मचाऱ्यांना, सहायक कक्ष अधिकारी होण्याची संधी मर्यादित विभागीय परीक्षा पात्रतेची अधिसूचना जारी

मंत्रालय मधील विभागातील सहायक कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी सहायक कक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published.