Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, मरीन ड्राईव्हला पर्यटकांसाठी सी साईड प्लाझा आणि लेझर शो… प्रसाधनगृह, आसन व्यवस्था, स्वच्छता, सुशोभीकरण यासाठी मुंबई महानगरपालिका करणार उपाययोजना

देश विदेशातून येणारे पर्यटक आणि मुंबईकर नागरिकांसाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात एक व्ह्युविंग डेक (सी साईड प्लाझा) तयार करण्यासोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तसेच सार्वजनिक प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले.

मरीन ड्राईव्ह परिसरात देश विदेशातून येणारे पर्यटक आणि मुंबईकर नागरिकांसाठी सुविधा, स्वच्छता व सुशोभीकरण कामांचा आढावा घेणारा पाहणी दौरा मुख्यमंत्री शिंदे यांनी आज ( १ मे २०२३) केला. त्यावेळी ते बोलत होते. या परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कामांची तसेच उपाययोजनांची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिली.

या पाहणीप्रसंगी महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महिला बालविकास आणि पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, उपआयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, ए विभागाचे सहायक आयुक्त शिवदास गुरव आदींसह संबंधित सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मुंबई महानगरात जगभरातून पर्यटक येतात. खासकरून मरीन ड्राईव्ह परिसराला सर्वच पर्यटक हमखास भेट देतात. या पर्यटकांना तसेच या परिसरात विरंगुळा म्हणून भेट देणाऱ्या मुंबईकर नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निरनिराळ्या सोयी-सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजचा दौरा करून महानगरपालिका प्रशासनाला निर्देश दिले. मरीन ड्राईव्ह परिसरातील सी फेसिंग इमारतींना विशिष्ट रंग देण्यात यावा. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो याठिकाणी सुरू करावा, असे सांगून सध्या सुरू असलेल्या सुशोभीकरण कामांच्या आणि स्वच्छतेच्या अनुषंगानेही मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध सूचना केल्या.

महानगरपालिकेच्या सुरू असलेल्या कामांची माहिती देताना आयुक्त चहल म्हणाले की, मरीन ड्राईव्ह मध्ये पर्यटनाच्या अनुषंगाने एक व्ह्युविंग डेक (सी साईड प्लाझा) तयार करण्यात येत आहे. व्ह्युविंग डेक निर्मिती ही नियोजन विभागाकडून केली जाणार आहे. एकूण ५३ मीटर लांब व ५ मीटर रुंद असा सी साईड प्लाझा नागरिकांना चालण्यासाठी तसेच समुद्र पाहण्यासाठी जेट्टीच्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्राच्या दिशेने (सी फेस) आसन व्यवस्था रचना येत्या काही दिवसात करण्यात येईल. त्यामुळे पर्यटकांना समुद्र पाहण्यासाठी चांगली, सुखकर जागा मिळेल. त्यादृष्टीने कामाला सुरूवात करण्यात येत आहे, असेही आयुक्त चहल यांनी नमूद केले.
दरम्यान, मरीन ड्राईव्ह परिसरात येणारे नागरिक आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर उत्कृष्ट दर्जाचे प्रसाधनगृह उभारण्यात यावे, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यावर, खासगी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व सहभागाने (सीएसआर) दोन प्रसाधनगृह उभारण्यात येतील, याबाबतचे कार्यादेश लवकरच देण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांनी दिली.

Check Also

सीबीएसईने पुन्हा एकदा ११ वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम बदलला शैक्षणिक संचालक जोसेफ इम्युन्युअल यांची माहिती

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० शी संरेखित करण्यासाठी २०२४-२५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *