Breaking News

छत्रपती पुतळा विटंबनाप्रकरणी सेनेचा भाजपाला इशारा, ज्वालामुखी बाहेर येवू देवू नका… भाजपाचे सगळे पोपट गप्प कसे ? खासदार अरविंद सावंत यांचा संतप्त सवाल

मराठी ई-बातम्या टीम

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना बंगळूरु येथे झाल्याने शिवसेना आक्रमक झाली असून राज्यभरात निषेध केला जात आहे. मुंबईतही ठिकठिकाणी शिवसैनिकांकडून निषेध आंदोलन करण्यात येत असून यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं फक्त स्वप्न दाखवलं नाही तर ते साकारही केले. त्या महाराजांचा अपमान भाजपाच्या सरकारमध्ये त्यांच्या आशीर्वादाने होत असेल तर देशाचे पंतप्रधान गप्प का? आमच्यात प्रचंड राग असून तो व्यक्त करत आहोत. तो राग संयमी पद्धतीने व्यक्त करत आहोत त्याची दखल घ्या.

भाजपाचे सगळे पोपट सतत टिवटिव करत असतात, ते सगळे गप्प आहेत. यातूनच हे ढोंगी, निर्ढावलेली माणसे असल्याचे लक्षात येतं. ज्वालामुखी बाहेर येऊ देऊ नका. तो बाहेर येऊ द्यायचा नसेल तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंचा ताबडतोब राजीनामा घ्या असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला.

दादरमध्ये एकीकडे शिवसैनिकांची पोलिसांसोबत झटापट झाली तर दुसरीकडे लालबागमध्येही शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपा नेत्यांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान गप्प का आहेत? अशी विचारणाही केली. त्यानंतर लालबाग येथे शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

सीमा भागात संतापाचे वातावरण असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या विधानामुळे आगीत तेल ओतले गेले. शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेची घटना क्षुल्लक आहे, असे विधान मुख्यमंत्री बोम्मई यांनी केले होते. त्यावर बेळगावसह सीमा भागातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या विधानाचा एकीकरण समितीने निषेध केला.

पोलिसांनी पहाटेपासूनच आंदोलकांची धरपकड सुरू केली. युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासह २७ जणांना अटक करण्यात आली. जामीन मिळू नये यासाठी १४ प्रकारची कलमे त्यांच्याविरोधात लावण्यात आली. न्यायालयासमोर उभे केले असता सायंकाळी २७ जणांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रमुख नेते माजी महापौर सरिता पाटील यांच्यासह ३४ जणांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

नितेश राणे यांना अटक होणार का? उत्तर उद्या मिळणार अटकपूर्व जामीनावर उद्या होणार सुणावनी

मराठी ई-बातम्या टीम जिल्हा बँक निवडणूकीतील प्रचाराच्या कारणावरून शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपा आमदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *