Breaking News

पवईतील जयभीम नगरातील मागासवर्गीयांची घरे तोडणा-या अधिकारी व बिल्डरवर गुन्हे दाखल माजी मंत्री नसीम खान यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश, ६५० कुटुंबियांना न्याय मिळणार

पवईच्या जयभीम नगरमधील जवळपास ६५० मागासवर्गीय परिवारांवर ६ जून २०२४ रोजी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस, बिल्डर निरंजन हिरानंदानी व स्थानिक आमदार यांनी संगनमताने बेकायदेशीर कारवाई केली. पोलिसांनी घरात घुसून लहान मुले, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक यांना मारहाण करत जबरदस्तीने घरांवर बुलडोझर चालवून त्यांना बेघर केले. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने बीएमसी अधिकारी, पोलीस, बिल्डरवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जयभीम नगरमध्ये मागील २५ ते ३० वर्षांपासून जवळफास ६५० मागासवर्गीय परिवार राहत होते. तेथे राहणाऱ्या मुलांचे शिक्षण तेथेच आजूबाजूच्या शाळा, महाविद्यालयामध्ये सुरू असताना भर पावसात बीएमसी एस विभागाचे अधिकारी, पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांच्यासह शेकडो पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच विकासक हिरानंदानी आणि स्थानिक आमदारांनी हातमिळवणी करून ६५० परिवारांना बेघर केले. त्यानंतर बिल्डर निरंजन हिरानंदानी यांनी आपल्या गुंडांचा वापर करून रातोरात तेथे चारही बाजूला पत्रे लावून सहा एकर (२४००० sq. meter) जागेचा ताबा घेतला. बेघर झालेले ६५० मागासवर्गीय परिवार निवारा नसल्यामुळे आजूबाजूच्या फुटपाथवर उघड्यावर रहात आहेत.

माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मो. आरिफ नसीम खान यांनी या बेघर झालेल्या सर्व रहिवाशांना सोबत घेऊन राज्याचे तत्कालीन महामहीम राज्यपाल रमेश बैस व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती दिली होती. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे झालेल्या घटनेची माहिती देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर एका पिडीताने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयाने सह पोलिस आयुक्त (गुन्हे) व अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी SIT गठित करून अहवाल मागविला होता. एसआयटी SIT ने सखोल चौकशी करून अहवाल सादर केला व त्या अहवालामध्ये नियमबाह्य कारवाई झाल्याचे सिद्ध झाले. एसआयटी SIT ने सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने एसआयटी SIT ला सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्याने फिर्यादीने पुन्हा न्यायालयात दाद मागीतल्यावर एसआयटी SIT क्राइम ब्रँच मार्फत मनपाचे उपायुक्त बिरादर, मनपा एस विभाग सहायक पालिका आयुक्त कसगीकर, मनपा अधिकारी आमिष बागडे, पंकज तसेच पोलिस उपायुक्त मंगेश शिंदे, पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोनवणे आणि हिरानंदानी बिल्डर्सचे संजय पांडे, अर्जून व इतर लोकांवर १० फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *