मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून मिशन अॅडमिशन मोहिमेची घोषणा करत आधुनिक, दर्जेदार, डीजिटल शिक्षणावर भर देणारा कौशल्य विकास, स्टेम रोबोटिक्स प्रयोगशाळा, ज्ञानपेटी, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, विचारशील प्रयोगशाळा, आधुनिक पद्धतीचा अवलंब करत मुंबईतील विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीत लक्ष्य केंद्रीत करत अर्थसंकल्प ३ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला.
महापालिकेच्या शिक्षण विभागाचा २०२५ – २६ या आर्थिक वर्षाचा ३ हजार ९५५.६४ कोटींचा अर्थसंकल्प पालिका अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी आज पालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांना पालिका सभागृहात सादर केला. मागील वर्षी ३४९७.८२ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यात या वर्षीच्या अर्थसंकल्पात ४५८ कोटींची वाढ करण्यात आली आहे.
मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार व डिजीटल शिक्षण देण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. कार्यानुभव शिक्षण ऑनलाईन, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, ई वाचनालय, डिजिटल क्लासरूम, टॅब पुरवठा, ज्ञानपेटी, विद्यार्थ्यांच्या आरोग्य साधनांवर सुधारणा असा डिजीटल शिक्षणावर भर देणारा हा अर्थसंकल्प आहे. तसेच पालिकेच्या विद्यार्थ्यांकरीता किचन गार्डन हा नवा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी तील गणवेषधारी विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानापासून ते शाळेपर्यंत बेस्ट मार्फत मोफत बस प्रवास सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच ज्या मार्गावर बेस्ट बसची सुविधा उपलब्ध नाही अशा मार्गांवर बेस्टमार्फत विशेष बस सेवा पुरवण्यात येत आहे. या योजने अंतर्गत सन २०२४-२५ मध्ये (जुलै २०२४ अखेरपर्यंत) प्राथमिक शाळांतील १४,९०० व माध्यमिक शाळांतील ४८२३ अशा एकूण १९७२३ विद्यार्थ्यांना चलो कार्डचे वितरण करण्यात आले. यासाठी प्राथमिक शाळांसाठी ६ कोटीची तर माध्यमिकसाठी २.७० कोटीची तरतूद करण्यात आली.
माध्यमिक शाळांमध्ये १२ प्रकारच्या अभ्यासक्रमांसह एकूण २२० कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आली असून यासाठी ५० लाखाची तरतूद करण्यात आली आहे तर कौशल्य विकास प्रशिक्षणावरही भर देण्यात आला आहे. कौशल विकासावर आधारित शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हा मुख्य उद्देश असल्याने महापालिकेच्या निवडक शाळांमधील मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
दरम्यान पालिकेच्या १८ विशेष शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांकरता तपासणी व निदान केले जाईल. फिजिओ, स्पीच आणि ऑक्युपेशनल थेरपी साठी आवश्यक साहित्य खरेदी करून दिले जाणार आहे. शालेय इमारतीच्या संरक्षक भिंतीवर आतल्या बाजूस विद्यार्थ्यांना शैक्षणिक नैतिक मूल्य व सामाजिक जबाबदारीचे संदेश देणारे चित्रांचे रेखाटन केले जाणार आहे. तसेच शाळांमध्ये नावीन्यपूर्ण गणित व विज्ञान केंद्र उभारण्यात येणार आहेत.
विशेष तरतूदी
१) महापालिका शालेय विद्यार्थ्यांना खगोलीय घडामोडींचे ज्ञान व त्या विषयातील जिज्ञासू वृत्ती वाढीकरीता तसेच विद्यार्थ्यांमधील निरीक्षण, एकाग्रता व आकलन क्षमतेमध्ये वाढ होऊन संशोधन वृत्ती जागरुक होण्यासाठी खगोलीय प्रयोगशाळांची साहित्यांसह उभारणी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
२) २०२२ ते २०२५ या कालावधीकरीता पालिकेच्या एकूण ४६९ शाळेंच्या इमारतींची देखभाल, स्वच्छता व सुरक्षेसाठी १६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
३) पालिकेच्या शाळांमधील एकूण ७९३४ वर्गापैकी एकूण ३ हजार ८१४ वर्गखोल्या डिजीटल करण्यात आल्या आहेत. उर्वरित ४१२० वर्ग टप्प्या- टप्प्याने डिजीटल करण्यात येणार आहेत. त्यासाठी प्राथमिकसाठी २१.२२ कोटी तर माध्यमिक शाळांसाठी ४.०७ कोटीची तरतूद करण्यात आली.