Breaking News

जेव्हा वचन दिलेत तेव्हा पासून कर माफ करा भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार

मराठी ई-बातम्या टीम

आतापासूनच नव्हे तर वचन दिलेत त्या तारखे पासून ५०० चौ.फु. घरांचा मालमत्ता कर पुर्ण माफ करा अन्यथा त्या तारखेपासून आतापर्यत वसूल केलेले पैसे परत करा अशी मागणी भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी करत आता सत्तेची खुर्ची डळमळीत झाली म्हणून शिवसेनेला मुंबई”करां”ची आठवण झाली असा टोलाही लगावला.

मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात येत असल्याची घोषणा सरकारने केली. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, या निर्णयाला एवढा उशीर का झाला? गेली चार वर्षे का निर्णय घेण्यात आला नाही? त्यामुळे आतापासून नको तर मागील चार वर्षांचा कर ही मुंबईकरांना परत करा. जेव्हा वचन दिलेत तेव्हा पासूनची करमाफी करा अशी मागणी ही त्यांनी केली.

मुंबईतील अती श्रीमंत सोडून ज्या मध्यमवर्गीयांची घरं ५०० चौ. फु. पेक्षा मोठी आहेत, त्यांचाही ५०० चौ. फु. पर्यंतचा कर माफ करा. म्हणजे ज्या मध्यमवर्गीय मुंबईकरांची घरे ६००, ६५०, ७०० चौरस फुटाची आहेत, त्यांचाही ५०० चौरस फुटापर्यंत कर माफ करा व त्यापेक्षा जास्त असलेल्या क्षेत्रफळाचाच कर त्यांना आकारण्यात यावा. यासोबतच ५०० चौ. फु.पर्यंतच्या दुकानदारांही हीच सुट देणार का? ज्यांचा मुंबईत फुलांचा, भाजीचा, केशकर्तनालय, फळे सारख्या व्यवसाय करणारा छोटा व्यापारी आहे, त्याच्या गाळ्याचा ५०० चौ. फुटापर्यंतचा कर माफ करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता, तरीही प्रथम बिल्डरांना प्रिमियममध्ये ११ हजार कोटींची सुट दिलीत. बार,पब,रेस्टॉरंटना लायसन्स फी मध्ये सवलत दिलीत. विदेशी दारुला करात ५०% सुट दिलीत. वायनरींवर पण सवलतींची खैरात झाली… मग मुंबईकरांच्या निर्णयाला का विलंब झाला? आता पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली का? असा सवालही त्यांनी केला.

Check Also

सनदी अधिकारी रूबल अग्रवाल यांना “बोंगिरवार उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार” बोंगिरवार फाउंडेशनच्यावतीने अंकिल गोयल यांचाही पुरस्काराने सन्मान

मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या पुणे शहरात आरोग्य व्यवस्था मजबूत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *