Breaking News

पवार म्हणाले, माज दाखविण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी केली; मराठी टक्का जावू देवू नका बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा शुमारंभ प्रसंगी पवारांनी मारली कौतुकाची थाप

मुंबई : प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रावर संकटांवर संकट येत आहेत. मात्र संकटकाळात असतानाही विकासासाठीचा माज दाखविण्याची हिमंत मुख्यमंत्र्यांनी दाखविल्याचे कौतुकोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल काढत या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठीचा घेतलेला पुढाकाराचे सारे श्रेय त्यांचेच असल्याचे त्यांनी सांगितले.

बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज (बंटी) पाटील, महापौर किशोरी पेडणेकर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत यांच्यासह अनेक मंत्री आणि राजकिय नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन वरळीच्या जांबोरी मैदानावर करण्यात आले होते.

आजचा दिवस हा ऐतिकासिक असून या दिवशी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले योगदान देणारे कॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळकांची १०० वी पुण्यतिथी आज आहे. तसेच या दिवसानिमित्त दोन्ही महापुरूषांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. या दिवशीच बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचा शुमांरभ करण्याचा निर्णय घेतला याचे सारे श्रेय मुख्यमंत्र्याचे असल्याचे सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या धाडसाचे त्यांनी कौतुक केले.

आता या ठिकाणी उंचच उंच इमारती उभारल्या जातील. २० माळ्याच्या ३० माळ्याच्या इमारती उभारल्या जातील. मात्र येथून मराठी टक्का बाहेर जाणार नाही यासाठी काळजी घ्या असे आवाहन करत मुंबईतल्या गिरणगावातील प्रत्येक भागात मराठी टक्का राहिला पाहिजे मराठी आवाज राहिला पाहिजे याची काळजी घ्यावी लागणार आहे. येथून एकही मराठी माणूस गेला नाही पाहिजे याची काळजी घ्या अशी सूचनाही त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्र्यांना यावेळी केली.

बीडीडी चाळींना एक इतिहास असून या इमारतींमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांचे वास्तव्य राहिलेले आहे. तसेच प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, क्रिकेटपटू सुनिल गावस्कर, साहित्यिक पु.ल.देशपांडे यांच्यासह अनेक जण या परिसरात वास्तव्याला असल्याचे सांगत टिळकांना स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे असल्याचा अग्रलेख लिहिल्यानंतर इंग्रजांनी त्यांना अटक केली. त्यावेळी गिरणगावातील सर्व गिरण्या कामगारांनी बंद ठेवल्याची आठवणही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितली.

Check Also

महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच ‘या’ परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *